एन.जी. ग्रुप'वर मोक्काचा फास; खून, खंडणी, दहशतीच्या साम्राज्याला पोलिसांचा जबरदस्त झटका!"
"एन.जी. ग्रुप'वर मोक्काचा फास; खून, खंडणी, दहशतीच्या साम्राज्याला पोलिसांचा जबरदस्त झटका!"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~सांगली जिल्ह्यात अनेक वर्षांपासून खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, अवैध शस्त्रांचा वापर आणि दहशत माजवणाऱ्या 'एन.जी. ग्रुप' या संघटित गुन्हेगारी टोळीवर अखेर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) लागू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कारवाईत एका बालकासह एकूण ९ आरोपींना मोक्काच्या कचाट्यात आणण्यात आले असून, जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीविरोधातील ही मोठी कारवाई मानली जात आहे.
संजयनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वेदांत मारुती बंडगर खून प्रकरणाच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या टोळीची गुन्हेगारी पार्श्वभूमी उघडकीस आणली. तपासात टोळीचा प्रमुख निलेश विठोबा गडदे याने आपल्या साथीदारांसह सांगली, मिरज, कुपवाड, जत, कवठेमहांकाळ तसेच कर्नाटकातील काही भागांत संघटित गुन्हेगारीचे जाळे उभारल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांच्या माहितीनुसार, सन २०१७ ते २०२६ या कालावधीत या टोळीने वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, गंभीर मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या, अवैध शस्त्रांचा वापर, अंमली पदार्थांशी संबंधित गुन्हे आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारे अनेक गंभीर गुन्हे केले.
या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी मोक्का लागू करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे सादर केला होता. प्रस्तावाची छाननी करून विशेष पोलीस महानिरीक्षकांनी आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाईस मंजुरी दिली.
या कारवाईमुळे सांगली जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात असून, अशा गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत करत आहेत.

No comments: