परळीत महावितरण कर्मचाऱ्यांविरोधात नागरिकांचा संताप; कामकाजावर गंभीर प्रश्न, स्टाफ बदलण्याची मागणी
परळीत महावितरण कर्मचाऱ्यांविरोधात नागरिकांचा संताप; कामकाजावर गंभीर प्रश्न, स्टाफ बदलण्याची मागणी
~~~~~~~~~~~~~~~~~
अमर इंदलकर.
~~~~~~~~~~~~~~~~~
परळी परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे महावितरणच्या स्थानिक कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक वेळा तक्रारी करून आणि लेखी अर्ज देऊनही समस्यांची वेळेत दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वारंवार तक्रारी करूनही वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना होत नसून, तक्रारींना समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांचा संयम सुटत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील महावितरण कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सततच्या वीजखंडितीमुळे घरगुती ग्राहक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच लघुउद्योगांना मोठा आर्थिक व मानसिक फटका बसत असल्याचे नागरिकांनी सांगितले. अनेकदा तासन्तास वीजपुरवठा खंडित राहत असल्याने दैनंदिन जनजीवन विस्कळीत होत असल्याची तक्रारही करण्यात आली.
परिस्थितीची तातडीने दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची निष्पक्ष चौकशी करावी, जबाबदारी निश्चित करावी आणि आवश्यक असल्यास संबंधित स्टाफची बदली करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच परळीतील वीजपुरवठा नियमित, अखंडित आणि दर्जेदार करण्यासाठी प्रभावी उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने लवकरात लवकर ठोस निर्णय घेतला नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

No comments: