Header Ads

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात कठोर शिक्षा!

 अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात कठोर शिक्षा! आरोपीला १५ वर्षांची सक्तमजुरी; दहिवडी पोलिसांच्या तपासाला न्यायालयाची शिक्कामोर्तब.

दहिवडी | प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला धमकावल्याप्रकरणी दहिवडी येथील आरोपीला न्यायालयाने १५ वर्षांची सक्तमजुरी आणि ६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावत कठोर संदेश दिला आहे. दहिवडी पोलिसांनी केलेल्या सक्षम तपासामुळे या प्रकरणात दोष सिद्ध होऊन पीडितेला न्याय मिळाला.

या प्रकरणातील आरोपी गणेश दिनकर गायकवाड (वय २७, रा. दहिवडी, ता. माण, जि. सातारा) याने अल्पवयीन मुलीला फूस लावून इमारतीतील मोकळ्या जागेत नेले व तिचा विनयभंग केला. तसेच ही बाब कोणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

या घटनेनंतर दहिवडी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३५४, ५०६ तसेच POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले.

या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, फलटण येथे झाली. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. अजित पवार यांनी प्रभावी युक्तिवाद केला. उपलब्ध पुरावे आणि साक्षींच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत १५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि ६ हजार रुपये दंड ठोठावला.

या प्रकरणाच्या यशस्वी तपासासाठी पोलीस अधीक्षक सातारा, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी (दहिवडी विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाण्याच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. तपास अधिकाऱ्यांनी प्रभावी तपास करून न्यायालयात भक्कम पुरावे सादर केल्याने आरोपीला कठोर शिक्षा झाली.

No comments:

Powered by Blogger.