Header Ads

उंचगावात गणेशोत्सवासाठी पोलिसांचा सज्जतेचा इशारा; नियम पाळा, उत्सव शांततेत साजरा करा!

 उंचगावात गणेशोत्सवासाठी पोलिसांचा सज्जतेचा इशारा; नियम पाळा, उत्सव शांततेत साजरा करा!



फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

 उंचगाव (करवीर)

करवीर तालुक्यातील उंचगाव येथील श्री मंगोबा देवालयात आगामी गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुव्यवस्थित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडावा यासाठी गांधीनगर पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता व समन्वय बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीस पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, उपपोलीस निरीक्षक अतुल कदम तसेच वरिष्ठ अधिकारी आप्पासो पवार प्रमुख उपस्थित होते. गावातील सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष, शांतता समिती सदस्य, गणेश मंडळांचे अध्यक्ष व कार्यकर्ते, साऊंड-लाईट सिस्टिम चालक-मालक, डिजिटल व प्रिंटिंग व्यावसायिक, बीट अधिकारी आणि पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत गणेशोत्सवासाठी आवश्यक नोंदणी, परवानग्या, मंडप उभारणी, विद्युत सुरक्षा, ध्वनी प्रदूषण नियम, मिरवणूक मार्ग, फटाक्यांचा वापर, महाप्रसाद व्यवस्था, ड्रोनवर बंदी, अंमली पदार्थांवर कारवाई, बीभत्स नृत्य व आक्षेपार्ह गाणी, तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट टाळण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व मंडळांना परंपरागत व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी उत्सवादरम्यान येणाऱ्या अडचणी मांडल्या असून त्यांचे तत्काळ निरसन करण्यात आले.

गांधीनगर पोलिसांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, प्रशासनाच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करूनच उत्सव साजरा करावा. कोणताही अनुचित प्रकार, कायदा व सुव्यवस्थेला बाधा किंवा संशयास्पद घटना निदर्शनास आल्यास तातडीने गांधीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

No comments:

Powered by Blogger.