Header Ads

मुदत संपली तरी खाद्यपदार्थांची विक्री सुरू?; प्रशासनाच्या कारवाईवर नागरिकांचा सवाल

 मुदत संपली तरी खाद्यपदार्थांची विक्री सुरू?; प्रशासनाच्या कारवाईवर नागरिकांचा सवाल.


कुपवाड :- चटपटीत खाद्यपदार्थांसाठी मुलांचा हट्ट आणि त्यांच्या हट्टापुढे हात टेकणारे पालक याचाच गैरफायदा घेत  विश्रामबाग कुपवाड शहर व परिसरातील काही बेकरी, टपऱ्या आणि खाद्यपदार्थ विक्रेते नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप होत आहे. शहरातील विविध ठिकाणी मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याची चर्चा असून, या प्रकाराला आळा घालणार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

हल्ली चटपटीत व तयार खाद्यपदार्थ खाण्याचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या काही वर्षांत शहरातील गल्ली-बोळांमध्ये बेकरी, स्नॅक्स सेंटर, खाद्यपदार्थांच्या टपऱ्या आणि लहान-मोठी दुकाने मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. मात्र, या ठिकाणी विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांची मुदत, साठवणूक, स्वच्छता आणि गुणवत्ता यांची नियमित तपासणी केली जाते का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

काही ठिकाणी केक, खारी, ब्रेड, फरसाण आदी पदार्थ मुदत संपल्यानंतरही विक्रीसाठी ठेवले जात असल्याचे आरोप नागरिकांकडून केले जात आहेत. काही पदार्थांचे लेबल बदलून किंवा नवीन लेबल लावून विक्री केली जाते का, याचीही प्रशासनाने सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

सणासुदीलाच प्रशासनाला जाग येते का?

खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी संबंधित अन्न सुरक्षा यंत्रणेची आहे. अधिकारी खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवू शकतात आणि नमुने दोषी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाते.

मात्र, ही तपासणी केवळ सण-उत्सवांच्या काळापुरतीच मर्यादित राहते का? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. नियमित तपासणी होत नसेल तर नियम धाब्यावर बसवून मुदतबाह्य पदार्थ विकणाऱ्यांचे फावणारच. त्यामुळे केवळ जुजबी कारवाई न करता नियमित तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दुकानांसोबत निर्मिती केंद्रांचीही तपासणी करा

केवळ दुकानातील तयार खाद्यपदार्थ तपासून हा प्रश्न सुटणार नाही. ज्या ठिकाणी केक, ब्रेड, फरसाण, खारी लादी पाव आणि अन्य खाद्यपदार्थ तयार केले जातात, त्या निर्मिती केंद्रांचीही तपासणी होणे गरजेचे आहे.

तेथील स्वच्छता, पाण्याची गुणवत्ता, कच्चा माल, साठवणूक व्यवस्था तसेच कामगारांची स्वच्छता याबाबत प्रशासनाने तपासणी करावी. अस्वच्छ वातावरणात तयार होणारे खाद्यपदार्थ नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

पालकांनीही सतर्क राहण्याची गरज

विशेषतः लहान मुलांना आकर्षित करणारे खाद्यपदार्थ खरेदी करताना पालकांनी मुदत, पॅकिंग, लेबल आणि पदार्थाची स्थिती तपासावी. मात्र, ग्राहकांची जागरूकता जितकी महत्त्वाची आहे, तितकीच नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे.

No comments:

Powered by Blogger.