कुपवाड दुहेरी हत्याकांडाचा तपास अवघ्या १३ दिवसांत पूर्ण; दोषारोपपत्र दाखल
कुपवाड दुहेरी हत्याकांडाचा तपास अवघ्या १३ दिवसांत पूर्ण; दोषारोपपत्र दाखल पालकमंत्री चंद्रकांत पाटील व विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या आदेशाची कुपवाड पोलिसांकडून तत्पर अंमलबजावणी.
कुपवाड | प्रतिनिधी राजू कदम
कुपवाड येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या गुन्ह्याचा तातडीने तपास पूर्ण करून १५ दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिले होते.
या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करत कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आनंदराव घाडगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तपासातील विविध बाबींचा सखोल तपास करून अवघ्या १३ दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
गुन्ह्याचा तपास वेळेत पूर्ण करून न्यायालयात भक्कम पुराव्यांच्या आधारे दोषारोपपत्र सादर करण्यात आल्याने आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, यासाठी पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
“आरोपीला कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा मिळावी, यासाठी पुरावे भक्कमपणे न्यायालयासमोर मांडण्यात आले आहेत,” अशी भावना या कारवाईनंतर व्यक्त होत आहे.
दुहेरी हत्याकांडासारख्या गंभीर गुन्ह्याचा तपास निर्धारित १५ दिवसांच्या मुदतीपूर्वीच पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केल्याबद्दल कुपवाड पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. तपासाची ही तत्परता आणि पुराव्यांवर आधारित कारवाई नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास निर्माण करणारी ठरत आहे.

No comments: