४० दिवस पावसाचा दगा... आता उन्हाचा कहर!; सोयाबीन–कपाशीवर दुहेरी संकट, शेतकरी हवालदिल
४० दिवस पावसाचा दगा... आता उन्हाचा कहर!; सोयाबीन–कपाशीवर दुहेरी संकट, शेतकरी हवालदिल
४ दिवसांपासून तापमानाचा पारा चढला; जमिनीतील ओलावा संपत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती.
अमरावती | प्रतिनिधी : पी. एन. देशमुख.
-----------------------------------------------
अमरावती जिल्ह्यात यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांची अक्षरशः कोंडी झाली आहे. तब्बल ४० दिवसांच्या पावसाच्या खंडानंतर सप्टेंबरच्या १० आणि ११ तारखेला काही भागात झालेल्या हलक्या पावसाने पिकांना थोडाफार दिलासा मिळाला होता. मात्र आता सलग चार दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने आटत असून सोयाबीन, कपाशी आणि तूर पिकांवर गंभीर संकट निर्माण झाले आहे.
कृषी तज्ज्ञांच्या मते, दीर्घ पावसाच्या खंडामुळे सोयाबीनच्या उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. सध्या सोयाबीन शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत आहे. पण जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने शेंगा पूर्ण भरत नसल्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
गत काही दिवसांत जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली असून दोन दिवसांपूर्वी अमरावती शहराचा पारा ३५.८ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला. सोमवारी आणि मंगळवारीही कडक उन्हामुळे शेतातील माती कोरडी पडली. त्यामुळे पिकांची नैसर्गिक वाढ खुंटण्याची भीती वाढली आहे.
कपाशी आणि तूर पिकांनाही सप्टेंबरच्या सुरुवातीच्या पावसाने जीवदान मिळाले होते. मात्र आता वाढत्या उष्णतेमुळे आणि जमिनीतील ओलावा कमी झाल्याने या पिकांवरही प्रतिकूल परिणाम होत आहे. विशेषतः कपाशीची वाढ मंदावण्याची शक्यता कृषी क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
उद्यापासून पावसाची शक्यता; पण शेतकऱ्यांचा विश्वास डळमळला
हवामान विभागाने २४ सप्टेंबरपासून काही भागांत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र यंदा अनेक वेळा पावसाचा अंदाज वर्तवूनही ढग विरून गेल्याचा अनुभव असल्याने, "पाऊस प्रत्यक्ष पडल्याशिवाय विश्वास नाही," अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.
शेतकऱ्यांची चिंता वाढली,
४० दिवसांच्या पावसाच्या खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान.
वाढत्या उन्हामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी.
सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या प्रक्रियेवर परिणाम.
कपाशी व तूर पिकांनाही उष्णतेचा फटका.
वेळेत पाऊस न झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची भीती.

No comments: