Header Ads

सातारा शहरात मोटारसायकल चोरीचा छडा; सराईत चोरट्यास अटक २ लाख ९० हजार रुपये किमतीच्या सहा मोटारसायकली जप्त; चार गुन्हे उघडकीस

 सातारा शहरात मोटारसायकल चोरीचा छडा; सराईत चोरट्यास अटक

२ लाख ९० हजार रुपये किमतीच्या सहा मोटारसायकली जप्त; चार गुन्हे उघडकीस.

सातारा, दि. २४ सप्टेंबर २०२६ : सातारा शहर परिसरात मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाने मिरज, सांगली येथून ताब्यात घेतले. अभिजीत भरत पवार (वय ३२, रा. शेरेवाडी, ता. माण, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ सप्टेंबर रोजी गोडोली येथील साईबाबा मंदिर परिसरातून मोटारसायकल चोरीला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सातारा शहर डी.बी. पथकाने रेकॉर्डवरील वाहनचोरांच्या हालचालींवर लक्ष ठेवून तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपीचा शोध सुरू केला.

आरोपीचा निश्चित ठावठिकाणा मिळत नसल्याने पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते. अखेर मिळालेल्या तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला मिरज, सांगली येथून ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान आरोपीने सातारा शहर परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरीच्या मोटारसायकली विक्री करण्याच्या उद्देशाने एका ठिकाणी लपवून ठेवल्याची माहिती त्याने दिली. त्याने दाखविलेल्या ठिकाणाहून पोलिसांनी एकूण सहा मोटारसायकली, अंदाजे २ लाख ९० हजार रुपये किमतीच्या, जप्त केल्या.

या कारवाईत आतापर्यंत चार मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. उर्वरित दोन मोटारसायकली कराड शहर व दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याचे आरोपीने सांगितले आहे. या दोन्ही वाहनांचे इंजिन व चेसीस नंबर खोडण्यात आल्याने त्याबाबत पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

आरोपी अभिजीत पवार हा सराईत मोटारसायकल चोरटा असून त्याच्यावर यापूर्वी आठ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे यांच्यासह पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

No comments:

Powered by Blogger.