Header Ads

दसऱ्यानिमित्त स्वच्छता महाअभियानासाठी श्रीक्षेत्र आदमापूरचे बाळूमामा मंदिर दि. २ ते ५ ऑक्टोबर बंद राहणार.

दसऱ्यानिमित्त स्वच्छता महाअभियानासाठी श्रीक्षेत्र आदमापूरचे बाळूमामा मंदिर दि. २ ते ५ ऑक्टोबर बंद राहणार.

मुरगूड/ जोतीराम कुंभार

महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश या सहा राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि धनगर समाजाचे आराध्यदैवत असलेल्या भुदरगड तालुक्यातील श्रीक्षेत्र आदमापूर येथील श्री संत सद्गुरु बाळूमामा मंदिरात दसरा (विजयादशमी) सणानिमित्त विशेष स्वच्छता महाअभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी देवस्थान समितीने नियोजन केले आहे.

श्रीक्षेत्र आदमापूर हे महाराष्ट्रातील एक जागृत व नवसाला पावणारे देवस्थान म्हणून ओळखले जाते. हे मंदिर वर्षातील ३६५ दिवस २४ तास अखंड सुरू असते. येथे अहोरात्र मोफत अन्नछत्र (महाप्रसाद) सेवा सुरू असते. दररोज सरासरी १५ ते २० हजार भाविक दर्शनासाठी येतात. अमावस्या, पौर्णिमा, रविवार आणि भंडारा यात्रा उत्सवाच्या काळात ही संख्या लाखोंवर जाते.

वर्षभर होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे मंदिराचा गाभारा, सभामंडप, दर्शनबारी, अन्नछत्र परिसर, भक्तनिवास, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, शौचालये व संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण झाली आहे. भाविकांना पवित्र, स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी वातावरणात दर्शन घेता यावे यासाठी देवस्थानकडून दरवर्षी दसऱ्यापूर्वी स्वच्छता व देखभाल दुरुस्ती मोहीम राबवली जाते.

या मोहिमेअंतर्गत दि. २ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबर २०२५ या चार दिवस श्री संत बाळूमामा मंदिराचे मुख्य दर्शन आणि अन्नछत्र (महाप्रसाद सेवा) पूर्णपणे बंद* ठेवण्यात येणार आहे. तसेच दि. ५ ऑक्टोबर रोजी एका दिवसासाठी भक्तनिवासातील निवास व्यवस्था बंद राहणार आहे.

या कालावधीत गाभारा, बाळूमामा मूर्ती परिसर, सभामंडप, दर्शनरांगा, अन्नछत्र, धान्य कोठार, भांडारगृह, पाण्याच्या टाक्या व संपूर्ण मंदिर परिसराची हायप्रेशर मशिनने धुलाई, निर्जंतुकीकरण फवारणी, रंगरंगोटी, विद्युत व्यवस्था दुरुस्ती व आकर्षक सुशोभीकरणाची कामे करण्यात येणार आहेत.

 कामे पूर्ण झाल्यानंतर दि. ६ ऑक्टोबर २०२५ पासून पहाटेची काकड आरती, महाअभिषेक, नित्यपूजा, दर्शन, आरती, महाप्रसाद व भक्तनिवासाच्या सर्व सेवा पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती देवस्थान समितीने दिली आहे.

तरी महाराष्ट्र, कर्नाटकसह लांबून येणाऱ्या सर्व भाविकांनी गैरसोय टाळण्यासाठी याची विशेष नोंद घ्यावी व दि. २ ते ५ ऑक्टोबर या कालावधीत आदमापूरकडे येण्याचे टाळावे, आपल्या दर्शनाचे व मुक्कामाचे नियोजन दि. ६ ऑक्टोबरनंतर करावे आणि देवस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थानचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष रामांना मरेगुद्री व समस्त विश्वस्त मंडळ यांनी केले आहे.

No comments:

Powered by Blogger.