"मोझरीची लेक आता महाराष्ट्राच्या महिला संघटनेच्या नेतृत्वात; अश्विनी वितोंडे यांच्याकडे NPP ची मोठी जबाबदारी!"
"मोझरीची लेक आता महाराष्ट्राच्या महिला संघटनेच्या नेतृत्वात; अश्विनी वितोंडे यांच्याकडे NPP ची मोठी जबाबदारी!"
पी. एन. देशमुख | जिल्हा प्रतिनिधी, अमरावती (तिवसा/मोझरी)
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मोझरी येथील सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी वितोंडे यांची नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) च्या महाराष्ट्र महिला प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील महिला संघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने पक्षाने ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविली असून, त्यांच्या नियुक्तीची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली आहे.
मुंबई येथे मेघालयचे मुख्यमंत्री तथा NPP चे राष्ट्रीय अध्यक्ष कॉनराड संगमा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अमितदादा वेळुकर (पाटील) यांच्या उपस्थितीत या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली.
महिला सक्षमीकरणासाठी काम करण्याचा निर्धार
नियुक्तीनंतर अश्विनी वितोंडे यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याची ग्वाही दिली. राज्यातील महिलांचे प्रश्न शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचविणे, महिला कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन उभे करणे आणि गावपातळीपासून राज्यपातळीपर्यंत पक्षाची संघटनात्मक बांधणी करणे हे आपले प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
तळागाळातील महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर काम करण्यासोबतच पक्षाचे विचार आणि धोरणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सामाजिक कार्याचा भक्कम पाया
अश्विनी वितोंडे या गेल्या अनेक वर्षांपासून 'अक्षर मानव' या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. तालुका अध्यक्ष, जिल्हा सचिव, जिल्हाध्यक्ष, राज्य संचालक, राज्य महिला विभाग प्रमुख आणि राज्य कुटुंब विभाग प्रमुख अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत.
याच संघटन कौशल्याची दखल घेत NPP ने त्यांच्यावर राज्यातील महिला संघटनेची धुरा सोपविली असल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
तिवसा येथे नियुक्तीपत्र प्रदान.
२२ सप्टेंबर २०२६ रोजी तिवसा येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अमितदादा वेळुकर पाटील यांच्या हस्ते अश्विनी वितोंडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी प्रमोद इंगळे, अमर हरले, निलेश गाडेकर, योगेश सूर्यवंशी तसेच पत्रकार हेमंतभाऊ पखाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments: