Header Ads

कोल्हापूरगणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडल्या बद्दल १ वर्ष कारावास आणि ₹३०,००० दंडाची शिक्षा.

 कोल्हापूरगणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडल्या बद्दल १ वर्ष कारावास आणि ₹३०,००० दंडाची शिक्षा. 

प्रतिनिधी:रहिम पिंजारी.

--------------------------

कोल्हापूर: गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोल्हापूर न्यायालयाने शुक्रवारी (२३ सप्टेंबर २०२६) एक ऐतिहासिक आणि मोठा निकाल दिला आहे. 'गणेश तरुण मंडळ राजारामपुरी गल्ली नं. १२' या मंडळाशी संबंधित असणारे ट्रॅक्टर चालक-मालक अजित बाजीराव पाटील (रा. नणुंद्रे, ता. पन्हाळा) यांना न्यायालयाने १ वर्ष कारावास आणि ३०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.काय आहे नेमके प्रकरण?सन २०१६ मधील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोल्हापूर पोलीस व प्रशासनाने मंडळांना आवाजाच्या मर्यादेबाबत रीतसर नोटिसा बजावल्या होत्या. असे असतानाही, १६ सप्टेंबर २०१६ रोजी 'गणेश तरुण मंडळ राजारामपुरी गल्ली नं. १२' या मंडळाने कोल्हापूर शहरातील मुख्य मिरवणूक मार्गावर (मिरजकर तिकटी - बिनखांबी गणेश मंदिर - महाद्वार रोड - पापाची तिकटी) प्रचंड आवाजाची साऊंड सिस्टीम लावली होती.ही मिरवणूक जेव्हा बिंदू चौक येथे आली, तेव्हा पोलीस पथकाने 'नॉईस लेव्हल मीटर'द्वारे आवाजाची तीव्रता मोजली. त्यात आवाजाची पातळी कायदेशीर मर्यादेपेक्षा खूप जास्त असल्याचे आढळले. पोलिसांनी ध्वनीक्षेपकाचा आवाज कमी करण्याच्या सूचना देऊनही मंडळाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि मिरवणूक रेंगाळत ठेवली.याप्रकरणी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी भारतकुमार राणे यांच्या सूचनेनुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण नियम २०००, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ आणि भा.दं.वि. कलम १८८ अन्वये मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, सदस्य तसेच साऊंड व ट्रॅक्टर चालकांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. यापूर्वी मंडळाच्या इतर पाच जणांना न्यायालयाने शिक्षा सुनावलेली आहे.न्यायालयाचा निकाल:प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मा. श्रीमती पंकजा राजपूत यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारी वकील श्रीमती सायली ठोकळ आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी मांडलेले पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने ट्रॅक्टर चालक-मालक अजित बाजीराव पाटील यांना दोषी ठरवून १ वर्ष कारावास व ३०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.पोलीस प्रशासनाचे आवाहन:या कारवाईच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक मंडळांना कडक इशारा दिला आहे. सार्वजनिक उत्सव किंवा जयंत्या साजऱ्या करताना प्रशासनाने दिलेल्या नियमांचे आणि आवाजाच्या मर्यादेचे काटेकोर पालन करावे, अन्यथा संबंधितांवर अशीच कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. आण्णासाहेब जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण लोंढे, कोर्ट पैरवी पोलीस कर्मचारी विशाल तळेकर आणि अंकुश पाटील यांनी पार पाडली

No comments:

Powered by Blogger.