कळेत बेकरीला आग; दोन लाखांचे नुकसान.
कळेत बेकरीला आग; दोन लाखांचे नुकसान.
--------------------------------
कळे प्रतिनिधी
सुनिल मोळे
९८९०९०८०४७
--------------------------------
कळे येथील बाजार भोगाव मार्गावरील कळे बाजारपेठेत महालक्ष्मी बेकरीला आग लागून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. बुधवारी (ता. २३) रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अजय कृष्णात देसाई यांची कळे बाजारपेठेत महालक्ष्मी बेकरी आहे. ते रात्री साडेदहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. त्यानंतर रात्री फिरण्यासाठी आलेल्या महिलांना दुकानातून धूर येत असल्याचे निदर्शनास आले.
धूर येत असल्याचे लक्षात येताच साक्षी जितेंद्र कालेकर यांनी तात्काळ अजय देसाई यांचे चुलत भाऊ सतीश देसाई यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून माहिती दिली. त्याचवेळी पनुत्रे (ता. पन्हाळा) येथील सखाराम भिकाजी मोरे हे पुनाळ येथे मिरवणुकीसाठी ट्रॅक्टर घेऊन जात होते. त्यांना बेकरीला आग लागलेली दिसली.
आग आजूबाजूच्या दुकानांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने त्यांनी शेजारील दुकानदार मनोज झुरे यांच्याशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच वायरमन विनायक तडुलकर (चिंचवडे) यांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेऊन वीजपुरवठा खंडित केला.
त्यानंतर मनोज झुरे यांच्या बोअरवेलला पाईप जोडून नागरिकांनी पाण्याच्या साहाय्याने आग विझवली. नागरिकांनी वेळीच धाव घेतल्याने आग आटोक्यात आली आणि मोठा अनर्थ टळला. काही मिनिटांचा जरी उशीर झाला असता, तरी आग शेजारील दुकानांपर्यंत पसरली असती.
या आगीत बेकरीतील साहित्य, फ्रीजसह अन्य वस्तू जळून खाक झाल्या असून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

No comments: