गणेश विसर्जनात तडीपार आरोपींची एन्ट्री महागात! मिरज पोलिसांची कडक कारवाई बंदी आदेश धुडकावणाऱ्या दोन सराईत आरोपींवर गुन्हा; गणेशोत्सवात समाजकंटकांना पोलिसांचा इशारा
गणेश विसर्जनात तडीपार आरोपींची एन्ट्री महागात! मिरज पोलिसांची कडक कारवाई
बंदी आदेश धुडकावणाऱ्या दोन सराईत आरोपींवर गुन्हा; गणेशोत्सवात समाजकंटकांना पोलिसांचा इशारा.
मिरज | प्रतिनिधी : राजू कदम.
-----------------------------------
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी मिरज शहर पोलिसांनी तडीपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दोन सराईत आरोपींवर कठोर कारवाई केली आहे. बंदी असतानाही शहरात प्रवेश केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 223 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरज शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल भोरे (वय 22, कमानवेस-मंगळवार पेठ) आणि विश्वेश घोडके (वय 25, गोठण गल्ली, मिरज) यांना उपविभागीय दंडाधिकारी, मिरज यांनी 19 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत सांगली-मिरज-कुपवाड महापालिका हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करणारा तडीपार आदेश दिला होता.
मात्र, 22 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनादरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथक गस्त घालत असताना राहुल भोरे नागोबा कट्टा परिसरात, तर विश्वेश घोडके श्रीकांत चौक येथे आढळून आला. तडीपार आदेशाचा भंग केल्याने दोघांना तात्काळ ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
गणेशोत्सवात समाजकंटकांवर पोलिसांचे विशेष लक्ष
गणेशोत्सव काळात शांतता आणि सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर विशेष नजर ठेवण्यात येत असून, तडीपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मिरज शहर पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगुले आणि मिरज शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.

No comments: