भांडण सोडवणे पडले महागात! मध्यरात्री एडक्या, हॉकी स्टिकने दोघांवर जीवघेणा हल्ला; वसगडे हादरले.
भांडण सोडवणे पडले महागात! मध्यरात्री एडक्या, हॉकी स्टिकने दोघांवर जीवघेणा हल्ला; वसगडे हादरले.
------------------------------------
कोल्हापूर | प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
------------------------------------
करवीर तालुक्यातील वसगडे येथे भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करणे दोन जणांना चांगलेच महागात पडले. “आमचे भांडण का सोडवले?” असा जाब विचारत चौघा युवकांनी मध्यरात्री एडक्या, हॉकी स्टिक आणि लाथाबुक्क्यांनी दोघांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.
शुक्रवारी (२५ सप्टेंबर) रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास जानता राजा चौक येथे रामदास चंद्रकांत बागडी (३८) आणि विशाल राजेश स्वामी (३२) यांना बोलावून घेण्यात आले. त्यानंतर शिवीगाळ करत दोघांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
यावेळी आकाश प्रकाश गवळी याने हातातील एडक्याने रामदास बागडी यांच्या डोक्यावर वार केले. विशाल स्वामी हे सोडवण्यासाठी पुढे आले असता त्यांच्या डोक्यावरही एडक्याने वार करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर अर्जुन गोर्वीदा पोवार आणि दर्शन दिपक वाघमारे यांनी हॉकी स्टिकने मारहाण केली, तर अथर्व महादेव काटकर याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांना तातडीने कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी आकाश प्रकाश गवळी, अर्जुन गोर्वीदा पोवार, दर्शन दिपक वाघमारे आणि अथर्व महादेव काटकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास गांधीनगर पोलीस करत आहेत.

No comments: