Header Ads

सत्यम फाउंडेशनचा मदतीचा हात; वी. स. खांडेकर प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

 सत्यम फाउंडेशनचा मदतीचा हात; वी. स. खांडेकर प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप



कोल्हापूर : शाहूपुरी येथील वी. स. खांडेकर प्रशालेत सत्यम फाउंडेशनच्या वतीने होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या, स्केचपेन, कंपास, इंग्लिश स्पीकिंग बुक, ड्रॉइंग बुक, पट्टी, खोडरबर यांसह विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य देण्यात आले. साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले.

यावेळी सत्यम फाउंडेशनचे प्रतीक शिंदे यांनी फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. उमा जाधव यांनी प्लेट डोनेशन, रक्तदान शिबिरे, कोल्हापूर तसेच केरळमध्ये आलेल्या महापुराच्या काळात केलेली मदत, विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी शिष्यवृत्ती योजना तसेच महाराष्ट्रभर करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्य वाटपाची माहिती दिली.

“लहानपणापासूनच विद्यार्थ्यांनी एकमेकांना मदत करण्याची भावना जोपासावी. नवीन कौशल्ये आत्मसात करून अभ्यासात नैपुण्य मिळवावे. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन आत्मसंरक्षणासह विविध प्रकारची शिबिरे सत्यम फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येतील,” असे प्रतिपादन प्रियंका पाटील यांनी केले.

या कार्यक्रमास सत्यम फाउंडेशनचे प्रतीक शिंदे, उमा जाधव, प्रियंका पाटील, मुख्याध्यापक रणधीर मिरजकर, पर्यवेक्षक अनिल चव्हाण, जिमखाना प्रमुख लता पाटील, संस्थेचे सचिव भरत शास्त्री यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला बळ देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरला.

No comments:

Powered by Blogger.