Header Ads

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना, नवोपक्रमाला अविष्कार कार्यशाळेतून चालना - डॉ. तेलवे.

 विद्यार्थ्यांच्या कल्पनांना, नवोपक्रमाला अविष्कार कार्यशाळेतून  चालना - डॉ. तेलवे.

(रणसिंग महाविद्यालयामध्ये अविष्कार स्पर्धा कार्यशाळा संपन्न)

~~~~~~~~~~~~~~~~~~~

 इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब वालचंदनगर या महाविद्यालयामध्ये शुक्रवार, दि. 11 सप्टेंबर 2026 रोजी ARC कमिटी व IQAC विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, नवोपक्रमशीलता आणि चिकित्सक विचारसरणी विकसित करण्याच्या उद्देशाने Exploring Avishkar Competition 2026-27 या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे सन्मानीय प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, प्रथम सत्राचे मार्गदर्शक तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामतीचे वनस्पती शास्त्राचे प्रा. डॉ. अजित तेलवे, दुसऱ्या सत्राचे मार्गदर्शक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय इंदापूरचे उपप्राचार्य व भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. शिवाजी वीर, उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, प्रो. डॉ. प्रशांत शिंदे, ARC समन्वयक डॉ. विलास बुवा उपस्थित होते. ARC समन्वयक डॉ. विलास बुवा यांनी उपस्थितांचे स्वागत करीत विद्यार्थ्यांना अविष्कार स्पर्धेचे स्वरूप, संशोधन प्रकल्पाची निवड, संशोधन पद्धती, प्रकल्प सादरीकरण तसेच स्पर्धेतील विविध टप्प्यांविषयी मार्गदर्शन मिळावे, हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे हे स्पष्ट केले. प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका व उद्दिष्टे स्पष्ट केली. विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे केवळ स्पर्धेच्या दृष्टीने न पाहता समाजातील विविध समस्या ओळखून त्यावर अभ्यासपूर्ण व नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याचा प्रयत्न करावा, असे मत व्यक्त करीत विद्यार्थ्यांना संशोधन व नवोपक्रमाच्या माध्यमातून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचे आवाहन केले. कार्यशाळेचे पहिले प्रमुख वक्ते तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथील डॉ. अजित तेलवे यांनी विद्यार्थ्यांना अविष्कार स्पर्धेची संकल्पना, स्पर्धेचे विविध स्तर, संशोधन विषयाची निवड, संशोधनाची मांडणी आणि प्रकल्प सादरीकरण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूच्या सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय, कृषी, तंत्रज्ञानविषयक तसेच शैक्षणिक समस्यांचा अभ्यास करून त्यातून संशोधन विषय विकसित करावा, असे त्यांनी सांगितले. तसेच संशोधनामध्ये नाविन्य, वस्तुनिष्ठता, तथ्याधारित मांडणी आणि शास्त्रीय दृष्टिकोन यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

दुसरे प्रमुख वक्ते कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर येथील डॉ. शिवाजी वीर यांनी विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्पाची प्रभावी मांडणी, संशोधन पद्धती, माहिती संकलन, विश्लेषण, निष्कर्ष आणि अविष्कार स्पर्धेतील प्रकल्पाचे सादरीकरण याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी केवळ माहितीचे संकलन न करता त्या माहितीचे शास्त्रीय विश्लेषण करून त्यातून अर्थपूर्ण निष्कर्ष काढणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रकल्पाचे सादरीकरण करताना आत्मविश्वास, विषयाचे सखोल ज्ञान, वेळेचे नियोजन आणि प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्याची क्षमता यांना विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यशाळेमध्ये एकूण 28 प्राध्यापक व 50 विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेचे सुत्रसंचालन डॉ. बबन साळवे तर आभार डॉ. रामचंद्र पाखरे यांनी व्यक्त केले.

No comments:

Powered by Blogger.