गडमुडशिंगीत फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा जागर; शाळांच्या नामकरणासाठी रिपब्लिकन सेनेची मागणी.
गडमुडशिंगीत फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा जागर; शाळांच्या नामकरणासाठी रिपब्लिकन सेनेची मागणी.
गांधीनगर प्रतिनिधी | ३० सप्टेंबर
गडमुडशिंगी (ता. करवीर) : शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा सन्मान व्हावा, यासाठी गडमुडशिंगी येथील जिल्हा परिषद शाळांना फुले दाम्पत्याचे नाव देण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन सेना करवीर तालुक्याच्या वतीने करण्यात आली. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
रिपब्लिकन सेना करवीर तालुका अध्यक्ष भीमराव आनंदा गोंधळी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. गडमुडशिंगी येथील कुमार विद्यामंदिरचे नामकरण ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले कुमार विद्यामंदिर, गडमुडशिंगी’, तर कन्या विद्यामंदिरचे नामकरण ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले कन्या विद्यामंदिर, गडमुडशिंगी’ असे करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
तसेच शाळेच्या नवीन इमारतीस ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संकुल’ असे संयुक्त नाव देण्यात यावे, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
फुले दाम्पत्याने प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाची ज्योत पेटवून वंचित, गोरगरीब आणि महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. ‘विद्येविना मती गेली’ हा शिक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणाऱ्या फुले दाम्पत्याच्या कार्याची आठवण शाळेच्या नावातून जपली जावी, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली.
हे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तसेच करवीरचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अशोक चंद्रकला उद्धवराव घुगे यांनी निवेदन स्वीकारले.
नामकरणाचा ठराव तातडीने करावा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन सेना करवीर तालुक्याच्या वतीने देण्यात आला.
यावेळी मा भिमराव गोंधळी ( करवीर तालुका अध्यक्ष)सागर कुरडे (जिल्हा महासचिव), अर्जुन गोंधळी (करवीर महासचिव), प्रवीण आजवेकर (शहर अध्यक्ष), विनोद कांबळे (उपाध्यक्ष), विवेकानंद रजपूत (करवीर उपाध्यक्ष), अर्जुन कांबळे (करवीर महासचिव), शिवाजी कांबळे (करवीर संघटक), संदिप गोंधळी (करवीर कोषाध्यक्ष), अलंकार माने आदी उपस्थित होते

No comments: