दत्तनगर बस स्टँडची दुरवस्था; ST महामंडळासह प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी
दत्तनगर बस स्टँडची दुरवस्था; ST महामंडळासह प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी.
राजु कदम.
कुपवाड : कुपवाड एमआयडीसी परिसरातील दत्तनगर बस स्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली असून, या बसथांब्याकडे एसटी महामंडळासह स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
बसथांब्यावर नावाचा फलकही शिल्लक नसल्याने हा बस स्टॉप नेमका कुठे आहे, याची माहिती प्रवाशांना स्पष्टपणे होत नाही. त्याचबरोबर बसथांब्याच्या परिसरात स्वच्छतेचा अभाव असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बसण्याच्या जागेवर मोकाट कुत्र्यांचा वावर असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दत्तनगर, बामणोली परिसरातील विद्यार्थी, महिला, कामगार तसेच नागरिक दररोज या बसथांब्याचा वापर करतात. मात्र बसथांब्याच्या परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना बसची प्रतीक्षा करताना अस्वच्छ वातावरणाचा सामना करावा लागत आहे.
बसथांब्याची सदोष व जीर्ण अवस्था तातडीने दुरुस्त करून नवीन बसथांबा, बसस्थानकाचा नामफलक, स्वच्छता व्यवस्था आणि प्रवाशांसाठी सुरक्षित बसण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, दत्तनगर-बामणोली प्रशासनाने तसेच संबंधित एमआयडीसी प्रशासनाने परिसराची पाहणी करून बसथांब्याच्या दुरुस्तीबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
ST महामंडळ आणि संबंधित प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांमध्ये नाराजी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

No comments: