मलकापूर नगरपरिषदेतर्फे 'पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२६' जाहीर; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन.
मलकापूर नगरपरिषदेतर्फे 'पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२६' जाहीर; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन.
--------------------------------
मलकापूर प्रतिनिधी
रोहित पास्ते
--------------------------------
'स्वच्छ सर्वेक्षण' व 'माझी वसुंधरा अभियान ७.०' (सन २०२६-२७) अंतर्गत मलकापूर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी 'पर्यावरण पूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२६'चे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि शाश्वत परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत १०० गुणांचे मूल्यमापन केले जाणार असून, त्यामध्ये शाडूच्या मातीची मूर्ती (२५ गुण), पाणी बचत, जागतिक तापमानवाढ, प्रदूषणमुक्ती आणि 'स्वच्छ व सुंदर मलकापूर' या विषयांवर आधारित देखावा (४० गुण), कृत्रिम कुंडात वा घरगुती पद्धतीने विसर्जन (२५ गुण) आणि सहपरिवार 'माझी वसुंधरा' शपथ घेऊन जिपीएस (GPS) फोटो जमा करणे (१० गुण) अशा निकषांचा समावेश आहे. देखावा साकारताना केवळ पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करणे अनिवार्य आहे.
स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या प्रथम क्रमांकास ₹५,०००/-, द्वितीय क्रमांकास ₹३,०००/- आणि तृतीय क्रमांकास ₹२,०००/- रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवले जाईल.
नगरपरिषदेच्या पथकामार्फत १८ सप्टेंबर २०२६ रोजी प्रत्यक्ष पाहणी करून मूल्यमापन केले जाणार आहे. इच्छुकांनी १६ सप्टेंबर २०२६ पर्यंत नगरपरिषद कार्यालयातील आरोग्य विभागात कार्यालयीन वेळेत (सकाळी १० ते सायं. ६) नावनोंदणी करावी, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. रश्मी शंतनू कोठावळे, उपनगराध्यक्ष श्री. दिलीप आनंदा पाटील आणि मुख्याधिकारी श्रीम. अंगाई जयसिंगराव साळुंखे यांनी केले आहे.

No comments: