गांधीनगर वसाहत रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांची बदली रद्द करण्याची मागणी डॉ. दिलीप वाडकर यांना पुन्हा नियुक्त करण्याची ग्रामपंचायती व सामाजिक संघटनांची मागणी आरोग्यमंत्री आबिटकर आणि आमदार महाडिकांकडे निवेदन
गांधीनगर वसाहत रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांची बदली रद्द करण्याची मागणी डॉ. दिलीप वाडकर यांना पुन्हा नियुक्त करण्याची ग्रामपंचायती व सामाजिक संघटनांची मागणी आरोग्यमंत्री आबिटकर आणि आमदार महाडिकांकडे निवेदन.
-----------------------------------------गांधीनगर (ता. करवीर) येथील वसाहत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप वाडकर यांची बदली रद्द करून त्यांची पुन्हा याच रुग्णालयात नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गांधीनगर, वळीवडे आणि चिंचवाड येथील ग्रामपंचायत पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांनी यासंदर्भात आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार अमल महाडिक यांच्याकडे निवेदन दिले.
निवेदनानुसार, डॉ. वाडकर यांनी दोन वर्षांपूर्वी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासकीय शिस्त, स्वच्छता, कर्मचारी समन्वय, रुग्णांच्या तक्रारींचे निराकरण आणि विविध शासकीय आरोग्य योजनांची अंमलबजावणी यावर भर दिला. या काळात रुग्णालयाच्या कामकाजात सुधारणा झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
डॉ. वाडकर यांच्या कार्यकाळात रुग्णालयात विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्याने बाह्यरुग्ण विभागातील उपस्थितीत वाढ झाल्याचेही निवेदनात नमूद आहे. गांधीनगरसह वळीवडे, चिंचवाड आणि पंचक्रोशीतील नागरिक रुग्णालयात उपचारासाठी येत असल्याचे सांगण्यात आले.
रुग्णालयातील उपलब्ध साधनसामग्रीचा वापर, रुग्णांना मार्गदर्शन, आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देणे आणि कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारी निश्चित करणे या बाबींमुळे कामकाजात सुधारणा झाल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. डॉ. वाडकर यांच्या बदलीमुळे या व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करून बदलीच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली.
डॉ. वाडकर यांना पुन्हा वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्त करण्याबरोबरच रुग्णालयासाठी आवश्यक मनुष्यबळ, औषधसाठा आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
यावेळी गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे, पंचायत समिती सदस्य रवी मलानी, वळीवडेचे उपसरपंच भैय्या इंगवले, चिंचवाडच्या सरपंच श्रद्धा पोतदार, सरपंच रितू लालवानी, ग्रामपंचायत सदस्य महेश शेळके, महालक्ष्मी वुमन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता माने, पुनम परमानंदानी, विक्रम मोहिते, दलित महासंघाचे शहराध्यक्ष राजू कांबळे, उपशहराध्यक्ष अनिल हेगडे, निलेश चव्हाण, कपिल घाटगे, सनी चंदवानी, दीपक जमनानी, उदय पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ. वाडकर यांच्या बदलीबाबत ग्रामपंचायती आणि सामाजिक संघटनांकडून पुढील काळातही पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या मागणीवर आरोग्यमंत्री आबिटकर आणि आमदार महाडिक काय निर्णय घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.

No comments: