जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केली मिरज तालुक्यातील पिकांची पाहणी
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केली
मिरज तालुक्यातील पिकांची पाहणी.
सांगली, दि. 30 (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील खरीप हंगाम 2026 मध्ये Trigger-1 (प्रथम कळ) लागू झालेल्या मिरज तालुक्यात भेट देऊन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. कानडवाडी आणि मानमोडी या गावात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
यावेळी मिरजचे उपविभागीय अधिकारी विशाल यादव, मिरजच्या तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, तालुका कृषि अधिकारी मिलिंद निंबाळकर, प्रभारी गटविकास अधिकारी प्रशांत जगताप, मंडळ अधिकारी रवींद्र कानडे, मंडळ कृषि अधिकारी आत्माराम पवार, तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक, पोलीस पाटील, बाधित खातेदार यांच्यासह महसूल व कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, जिल्ह्यात पीक पंचनाम्याबरोबर पीक कापणी प्रयोग असे दुहेरी काम सुरू आहे. दहा दिवसात शासन आदेशाप्रमाणे पीक पंचनामे कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असून त्यानंतर याबाबतचा अहवाल शासनास सादर केला जाणार आहे. त्यानंतर नुकसान भरपाईबाबतचे शासनाचे आदेश होतील. दरम्यान, सद्यस्थितीत जिल्ह्यात चारा टंचाई नाही, पण खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात संभाव्य चारा टंचाईची शक्यता लक्षात घेऊन चारा जिल्ह्याबाहेर विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. या दृष्टीने प्रत्येक तपासणी नाक्यावर तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यानंतरही चारा टंचाई भासली तरी त्याबाबतचे पूर्वनियोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी कुमार पारिसा खोत आणि कुमार जिनपाल खोत यांच्या शेतातील उडीद, भूईमूग, सोयाबीन यांची पाहणी केली. पिकाखालील क्षेत्राची नोंद, मशागत, पेरणी, खते, बियाणे व मजुरी आदिंसाठी झालेला खर्च आणि कमी पावसामुळे सध्या पिकांची वाढ खुंटली असल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले.
काही ठिकाणी आगामी रब्बी हंगामाच्या अनुषंगाने ज्वारीची पेरणी करण्यासाठी पिके काढून टाकल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. यावर प्रत्यक्ष पंचनाम्यावेळी माहिती घेऊन कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. घोष यांनी यावेळी दिल्या. तसेच, सध्या परतीच्या पावसाची शक्यता लक्षात घेऊन प्रत्येक गटातील पीक पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
00000

No comments: