Header Ads

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीला ४ वर्षांचा कारावास; ५० हजारांचा दंड!

 अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीला ४ वर्षांचा कारावास; ५० हजारांचा दंड!

जत न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; पीडितेची साक्ष ठरली निर्णायक.


सांगली | फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि एकूण ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक ४ मधील मा. न्यायाधीश श्रीमती जे. ए. मोहंती यांनी हा निकाल दिला. या खटल्यात पीडित मुलीने न्यायालयात दिलेली साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.

नेमके प्रकरण काय?

न्यायालयात चाललेल्या स्पेशल केस क्रमांक १७१/२०२४ आणि जत पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर क्रमांक २४९/२०२४ या प्रकरणातील आरोपी जगदिश सुभाष चव्हाण (वय २५, रा. डफळापूर, ता. जत, जि. सांगली) याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप होता.

अभियोग पक्षाच्या म्हणण्यानुसार, आरोपी पीडित मुलीच्या घराजवळ राहत होता. तिच्या बालवयाचा गैरफायदा घेत त्याने तिच्याशी जवळीक साधून विश्वास संपादन केला. पीडिता अंगणात खेळत असताना बाजूचे घर दाखवण्याच्या बहाण्याने आरोपी तिला स्वतःच्या घरी 

घेऊन गेला. तेथे त्याने तिचा विनयभंग केल्याचा आरोप होता. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने घरी येऊन संपूर्ण प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर तिच्या वडिलांनी जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड यांनी केला. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान पीडित मुलीने शपथेवर दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. इतर साक्षीदारांनी घटनेला दुजोरा देण्याचे टाळले असतानाही पीडितेच्या साक्षीच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.


न्यायालयाने भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ अंतर्गत चार वर्षांची शिक्षा, तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ८ अंतर्गत चार वर्षांची आणि कलम १२ अंतर्गत तीन वर्षांची शिक्षा सुनावली. यासोबत एकूण ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

सरकारी पक्षाने मांडली प्रभावी बाजू

या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता व्ही. के. मुरचिटे, ए. एम. साटविलकर आणि एस. आर. हिंगमिरे यांनी काम पाहिले. पैरवी कक्ष अधिकारी मुद्दस्सर शेख (सहाय्यक पोलीस निरीक्षक), जत पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम बंडगर आणि पैरवी कक्षातील महिला पोलीस कॉन्स्टेबल रेखा यांनी सहकार्य केले.

अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या प्रकरणांत पीडितेची साक्ष आणि तपासातील पुरावे किती महत्त्वाचे ठरतात, हे या निकालातून अधोरेखित झाले आहे.

No comments:

Powered by Blogger.