बोंद्रे नगरात जल्लोषात घरगुती गणपती व गौराईंचे विसर्जन; ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दणाणला
बोंद्रे नगरात जल्लोषात घरगुती गणपती व गौराईंचे विसर्जन; ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दणाणला.
कोल्हापूर | प्रतिनिधी : विजय बकरे.
-----------------------------------------
कोल्हापूर शहरातील बोंद्रे नगर परिसरात घरगुती गणपती व गौराईंचे विसर्जन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत भाविकांनी महानगरपालिकेने उभारलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडात श्रींचे विसर्जन केले.
बोंद्रे नगर येथील कारी आई तरुण मंडळ आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त पुढाकारातून घरगुती गणपती व गौराई विसर्जनासाठी विशेष कुंडाची व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गंगाई लॉन, गणेश पार्क, सृष्टी पार्क, सीपीआर कॉलनी, अयोध्या कॉलनी, मथुरा कॉलनी आदी परिसरांतील महिला, पुरुष आणि लहान मुलांनी पारंपरिक वेशभूषेत ढोल-ताशांच्या गजरात, रिक्षा, दुचाकी व चारचाकी वाहनांच्या ताफ्यासह मिरवणुका काढल्या. "गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या!" अशा जयघोषांनी संपूर्ण बोंद्रे नगर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
पर्यावरणाचे भान राखत कृत्रिम कुंडात विसर्जन करण्यात आल्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श संदेशही या उपक्रमातून देण्यात आला. श्रद्धा, उत्साह आणि सामाजिक जाणीवेचा सुंदर संगम अनुभवत बोंद्रे नगर परिसरात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

No comments: