बामणोली विकासनगरमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट; लहान मुलाला चावा.
बामणोली विकासनगरमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट; लहान मुलाला चावा.
---------------------------------
बामणोली प्रतिनिधी
राजू कदम
---------------------------------
ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही उपाययोजना नसल्याने नागरिक संतप्त; “कुत्र्यांचा बंदोबस्त कधी करणार?” असा सवाल.
बामणोली येथील विकासनगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, रस्त्यावर खेळणाऱ्या लहान मुलांना तसेच नागरिकांना भीतीच्या वातावरणात वावरावे लागत आहे. नुकताच रस्त्यावर खेळत असलेल्या एका लहान मुलाला मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याचा प्रकार घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
विकासनगर परिसरातील रस्त्यांवर अनेक मोकाट कुत्री एकत्र फिरताना दिसत असून, त्यांचा वावर नागरिकांसाठी धोकादायक ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषतः लहान मुले रस्त्यावर खेळत असताना कुत्र्यांच्या झुंडीमुळे पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
या समस्येबाबत बामणोली ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच यांना नागरिकांनी माहिती देऊनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबरोबरच कुत्र्यांची नसबंदी, लसीकरण तसेच आवश्यक त्या उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, “एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त नेमका कधी करणार?” असा संतप्त सवाल विकासनगरमधील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

No comments: