Header Ads

गर्दीच्या ठिकाणी सोनसाखळी चोरणाऱ्या पती-पत्नीला मोक्काचा दणका! कराड पोलिसांची मोठी कारवाई.

 गर्दीच्या ठिकाणी सोनसाखळी चोरणाऱ्या पती-पत्नीला मोक्काचा दणका! कराड पोलिसांची मोठी कारवाई.

कराड | फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र

यात्रा-जत्रा, बसस्थानक अन् मिरवणुकांमध्ये हातसफाई; संघटित गुन्हेगारीविरोधात सातारा पोलिसांचा कठोर बडगा!

गर्दीचा फायदा घेत नागरिकांच्या गळ्यातील दागिने चोरणे आणि जबरी चोरीचे गुन्हे केल्याच्या आरोपांप्रकरणी पती-पत्नीच्या टोळीवर सातारा पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. या कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

टोळीप्रमुख श्रावण राजेश कांबळे (वय ३३) आणि त्याची पत्नी पुनम श्रावण कांबळे (वय २७, रा. मलकापूर, ता. कराड) अशी आरोपींची नावे आहेत. गर्दीची ठिकाणे, यात्रा-जत्रा, बसस्थानके, रॅली आणि मिरवणुकांमध्ये चोरी व जबरी चोरीचे गुन्हे आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

वरिष्ठांच्या मंजुरीनंतर मोक्क्याची कारवाई

या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७२१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल आहे. आरोपींविरुद्ध मोक्का लावण्यासाठी कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या माध्यमातून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर मोक्का कायद्याची कलमे वाढविण्यास मंजुरी देण्यात आली.

या गुन्ह्याचा पुढील तपास कराड विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, 

कराड शहरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा आणि कराड शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला.

संघटित गुन्हेगारीला आळा घालून नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने सातारा पोलिसांची ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या दागिन्यांना लक्ष्य करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर पाऊल उचलल्याने गुन्हेगारी प्रवृत्तींना स्पष्ट इशारा मिळाला आहे.

No comments:

Powered by Blogger.