Header Ads

सोन्याला पॉलिश करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेची फसवणूक! बिहारच्या दोघांना अटक; मिरज ग्रामीण पोलिसांचा पर्दाफाश.

 सोन्याला पॉलिश करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेची फसवणूक! बिहारच्या दोघांना अटक; मिरज ग्रामीण पोलिसांचा पर्दाफाश २५ ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्यांचे वजन अवघे १.८८६ ग्रॅम! १५ ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल जप्त.



बेळंकी | फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र

सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याचा बहाणा करत ज्येष्ठ महिलेची फसवणूक करणाऱ्या बिहारमधील दोन संशयितांना मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. उषाताई बबनराव गायकवाड (वय ७०, रा. बेळंकी, ता. मिरज) यांची फसवणूक करून सोन्याच्या बांगड्यांमधील सोने काढून घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत १५ ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पॉलिशच्या बहाण्याने सोन्यावर डल्ला!

११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास दोन अनोळखी इसम बेळंकी येथील उषाताई गायकवाड यांच्या घरी आले. पितळ, तांबे, चांदी आणि सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो, असे सांगून त्यांनी विश्वास संपादन केला. त्यानंतर सोन्याच्या बांगड्या एका पिवळसर द्रवात टाकून उकळण्याचा बनाव केला. प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगत बांगड्या स्वच्छ करून वापरण्यास दिल्या.

मात्र, बांगड्या हातात घालताना त्यांचे वजन कमी झाल्याचे उषाताई यांच्या लक्षात आले. वजन केले असता, पूर्वी २५ ग्रॅम असलेल्या बांगड्यांचे वजन अवघे १ ग्रॅम ८८६ मिलीग्रॅम भरले. त्यामुळे सुमारे १५ ग्रॅम सोन्याची फसवणूक झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिरज शहरातील गुन्ह्याशी साधर्म्य; तपासातून आरोपींचा माग.

बेळंकी येथील गुन्ह्याची पद्धत मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अशाच गुन्ह्याशी मिळतीजुळती असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी मिरज शहरातील संबंधित गुन्ह्यात अटक केलेल्या दोघांना न्यायालयाच्या परवानगीने ताब्यात घेऊन चौकशी केली.

या कारवाईत दुर्गेशकुमार कृष्णकुमार गुप्ता (वय २९) आणि देवेंद्रकुमार नरेशप्रसाद गुप्ता (वय ३६), दोघेही मूळचे बिहार राज्यातील खगडिया जिल्ह्यातील रहिवासी, यांना या प्रकरणात अटक करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पंचांसमक्ष त्यांच्याकडून १५ ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल होळकर करीत आहेत.

नागरिकांनी अनोळखी व्यक्तींना घरात बोलावून सोन्याचे दागिने पॉलिश करण्यास देताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन या घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे.

No comments:

Powered by Blogger.