Header Ads

घोसरवाड येथे मोटार केबलची चोरी; चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी

 *घोसरवाड येथे मोटार केबलची चोरी; चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी.

दतवाड – प्रतिनिधी(अर्जुन धों धुमाळे)

शिरोळ तालुक्यातील घोसरवाड परिसरात दुर्गामाता नदीकाठावर अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत मोटारींच्या केबल चोरी करण्याचा सपाटा लावला आहे. या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून, चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

घोसरवाड येथे दुर्गामाता नदीकाठावरील अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींच्या केबल चोरीला गेल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक शेतकऱ्यांना पुन्हा नवीन केबल खरेदी करून मोटारी सुरू करण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वीही या परिसरात अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या असून, वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. केबल चोरी झाल्यानंतर शेतीला पाणी देणे कठीण होत असून पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.

सध्या उन्हाळ्याच्या तीव्रतेत वाढ होत असल्याने शेतीला पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे. अशा परिस्थितीत मोटारींच्या केबल चोरी होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

तरी संबंधित पोलीस प्रशासनाने या चोरीच्या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन चोरट्यांचा शोध घ्यावा, परिसरात रात्रीची गस्त वाढवावी आणि शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत मोटारी व केबल चोरीच्या घटनांना आळा घालावा, अशी जोरदार मागणी घोसरवाड परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे.

No comments:

Powered by Blogger.