गांधीनगर पोलिसांचा ‘डबल धमाका’! अवघ्या ६ तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड; २.२० लाखांचा मुद्देमाल जप्त
गांधीनगर पोलिसांचा ‘डबल धमाका’! अवघ्या ६ तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड; २.२० लाखांचा मुद्देमाल जप्त
कोयना कॉलनीतील दोन तरुणांना अटक; चोरीची रिक्षा आणि लोखंडी सळ्या हस्तगत.
गांधीनगर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत चोरीचे दोन गुन्हे अवघ्या सहा तासांत उघडकीस आणले आहेत. या कारवाईत दोन तरुणांना ताब्यात घेऊन चोरीस गेलेली सुमारे २ लाख रुपये किमतीची रिक्षा आणि २० हजार रुपये किमतीच्या लोखंडी सळ्या, असा एकूण २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी कुणाल उर्फ गणेश दादासाहेब दबडे (वय १९) आणि आर्यन नानू जोसेफ (वय २१), दोघेही रा. कोयना कॉलनी, म्हसोबामाळ, गांधीनगर, यांना अटक करण्यात आली आहेरिक्षा चोरीचा तपास करताना दुसऱ्या गुन्ह्याचाही उलगडा!
फिर्यादी सरफराज रियाज मुश्रीफ (वय २९, रा. कोयना कॉलनी, गांधीनगर) यांच्या घरासमोर उभी केलेली काळी-पिवळी रिक्षा (एमएच ०९ ईएल २७१०) ही १४ ऑक्टोबरच्या रात्री ते १५ ऑक्टोबरच्या पहाटेच्या दरम्यान चोरीला गेली होती. याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१८/२०२६ दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अंमलदार विजय सोनुले यांना गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. चोरीची रिक्षा घेऊन संशयित चिंचवाडहून गांधीनगरकडे येणार असल्याचे समजताच पोलिसांनी चिंचवाड–गांधीनगर मार्गावरील हरिप्रिया रेसिडेन्सीसमोर सापळा रचला. या वेळी संशयितांसह रिक्षा ताब्यात घेण्यात आली.
रिक्षात सापडल्या चोरीच्या लोखंडी सळ्या!
रिक्षाची तपासणी केली असता त्यामध्ये २० हजार रुपये किमतीच्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या १० एमएमच्या लोखंडी सळ्या आढळून आल्या. या सळ्या गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुसऱ्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत दोन्ही संशयितांनी या चोरीतही सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईमुळे गांधीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ४१८/२०२६ आणि ४१९/२०२६ असे दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव आणि करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कैलास कोडग, सहायक पोलीस निरीक्षक अतुलकदम, सहायक फौजदार समीर मुल्ला, सचिन सावंत आणि पोलीस अंमलदार विजय सोनुले व अमोल देवकुळे यांनी ही कारवाई केली.
पुढील तपास सहायक फौजदार सचिन सावंत आणि समीर मुल्ला करीत आहेत.

No comments: