दुष्काळात मायक्रो फायनान्सकडून महिलांची लूट; सक्तीच्या वसुलीची चौकशी करा.
दुष्काळात मायक्रो फायनान्सकडून महिलांची लूट; सक्तीच्या वसुलीची चौकशी करा.संदेश रणवीर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
काळी दौ / महागाव : महागाव तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असून शेतीचे उत्पन्न नाही, मजुरीचे काम नाहीत. अशा बिकट परिस्थितीत तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व महिला बचत गटातील महिला मोठ्या आर्थिक संकटात सापडल्या असून मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणाऱ्या अव्वाच्या सव्वा व्याज आकारणी व बेकायदेशीर वसुलीची चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष संदेश गौतम रणवीर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात रणवीर यांनी म्हटले आहे की, महागाव तालुक्यातील गरजू महिलांना मोबाईल, मोटारसायकल, टी.व्ही., शिलाई मशीन व शेती कामासाठी कर्ज दिले जाते. या कर्जावर मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून अव्वाच्या सव्वा व्याज आकारले जात आहे.
हप्ता थकल्यास वसुली कर्मचारी थेट घरासमोर येऊन अपमानास्पद वागणूक देतात, शिवीगाळ करतात व मानसिक त्रास देतात. दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ आली आहे.त्यामुळे
दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन पुढील हंगामापर्यंत कर्जदारांना हप्ते भरण्यास मुदतवाढ द्यावी व व्याज माफी देण्यात यावी. तसेच या गंभीर विषयात तात्काळ लक्ष घालून गरीब शेतकरी व मजुरांना न्याय द्यावा, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.

No comments: