निंबी येथे भाजीपाला उत्पादक शेतकरी मार्गदर्शन मेळावा संपन्न; '
निंबी येथे भाजीपाला उत्पादक शेतकरी मार्गदर्शन मेळावा संपन्न; '
शेतकरी ते ग्राहक थेट विक्री'वर उपविभागीय अधिकारी श्री. आशिष बिजवल साहेब यांचे मार्गदर्शन
थेट भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार.
सिद्धार्थ कदम
पुसद तालुका प्रतिनिधि
पुसद (प्रतिनिधी):
निंबी व पार्डी परिसरातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन, मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्था, रुग्ण मित्र फाउंडेशन व गुरुदेव सेवा मंडळ शाखा (पुसद) यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष शेतकरी मार्गदर्शन व संवाद मेळावा उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम कर्मयोगी संत गाडगेबाबा स्मृतीस्थळ, पार्डी रोड, निंबी (जाधव बाग) येथे आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुसदचे उपविभागीय अधिकारी (एस.डी.ओ.) मा. श्री.आशिष बिजवल साहेब यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन कसे करावे, तसेच भाजीपाला व ताजा शेतीमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त नफा कसा मिळवावा (शेतकरी ते ग्राहक थेट विक्री), याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी असा शेतमाल थेट ग्राहकांना विकल्यास खेड्यातील तरुण-तरुणींना रोजगाराची एक नवीन संधी उपलब्ध होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, शेतकऱ्यांनी कच्चा शेतमाल थेट न विकता त्यावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया करून विकल्यास अधिक नफा मिळू शकतो, असा सल्लाही बिजवल साहेबांनी दिला.
संवाद सत्रादरम्यान उपस्थित भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी शेती संदर्भातील तसेच शेतमाल विक्री संदर्भातील विविध समस्या मांडल्या. यावर श्री. बिजवल साहेब यांनी शेतकऱ्यांच्या काही समस्यांचे जागेवरच तात्काळ निराकरण केले, तर उर्वरित समस्यांवर प्रशासकीय पातळीवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी शेतात स्वतः भाजीपाला पिकवून मध्यस्थांशिवाय थेट ग्राहकांना विक्री करणाऱ्या निंबी व पार्डी परिसरातील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्यपाल पुरस्कार प्राप्त शेतीनिष्ठ शेतकरी दत्तात्रय जाधव यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून सप्तखंजरी वादक पंकज पाल महाराज, दिनकर गुल्हाने, प्रकाश लामने व माणुसकीची भिंतीचे मार्गदर्शक ॲड. नितीन विजयराव जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुनील ठाकरे आणि पवन बोजेवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन रमेश डंबोळे यांनी केले. या मेळाव्याचा निंबी व पार्डी परिसरातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. आयोजक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

No comments: