Header Ads

हुपरी पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान!

 हुपरी पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान!

हुपरी प्रतिनिधी सचिन कुंभार



गांधी जयंती, शास्त्री जयंती व ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त अनोखा उपक्रम; ज्येष्ठांकडून पोलिसांचे कौतुक


हुपरी : महात्मा गांधी जयंती, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती तसेच ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून हुपरी पोलीस ठाण्याच्या वतीने हुपरी येथील आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाच्या संचालक मंडळासह सर्व ज्येष्ठ सभासदांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके व त्यांच्या सहकारी पोलीस बंधू-भगिनींनी हा उपक्रम राबविला.यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरेश इंग्रोळे, उपाध्यक्ष गणपतराव ढोणुक्षे यांच्यासह संचालक मंडळ व मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. विशेष म्हणजे दोन महिला ज्येष्ठ सदस्यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

     कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी केले. “मला ज्येष्ठ नागरिकांबद्दल मनापासून आदर आहे. समाजाला दिशा देण्यात ज्येष्ठांचे योगदान मोठे आहे,” असे त्यांनी सांगितले.

यानंतर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरेश इंग्रोळे यांनी मनोगत व्यक्त करताना हुपरी पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक हाके यांनी उपस्थित सर्व ज्येष्ठांना आपले मनोगत व्यक्त करण्याचे आवाहन केले. यावेळी ज्येष्ठांनी आपल्या विविध आठवणी व अनुभव सांगत पोलिसांशी मनमोकळा संवाद साधला.

उपाध्यक्ष गणपतराव ढोणुक्षे यांनी मनोगत व्यक्त करून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केल्याबद्दल हुपरी पोलीस ठाण्याचे तसेच सर्व पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांचे ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आभार मानले.दरम्यान, यावर्षी हुपरी व परिसरातील विविध ठिकाणी गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी केलेल्या उल्लेखनीय सहकार्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांचा अध्यक्ष सुरेश इंग्रोळे यांच्या हस्ते बुके देऊन सत्कार करण्यात आला.

   कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी आभार प्रदर्शन केले. त्यानंतर चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

      या सन्मान सोहळ्यामुळे उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले. ज्येष्ठांचा सन्मान करून पोलिसांनी जपलेला हा आपुलकीचा संवाद कौतुकास्पद असल्याचे सांगत उपस्थित ज्येष्ठांनी हुपरी पोलीस ठाण्याचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

No comments:

Powered by Blogger.