Header Ads

बोलण्याच्या बहाण्याने वृद्धाला लुटले; सांगली LCB चा दणका! एक आरोपी जेरबंद, २.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

 बोलण्याच्या बहाण्याने वृद्धाला लुटले; सांगली LCB चा दणका! एक आरोपी जेरबंद, २.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त.



जत | फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र

सांगली : बोलण्याचा बहाणा करून ६९ वर्षीय वृद्धाच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका आरोपीला जेरबंद करण्यात आले असून, सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण २ लाख २८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दुसरा संशयित साथीदार अद्याप फरार आहे.

दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी जत तालुक्यातील शेगाव गावातून रेवनाळ रस्त्यावरील शेताजवळ सयाप्पा ईश्वरा ओलेकर (वय ६९, रा. रेवनाळ) हे आले असताना पांढऱ्या रंगाच्या स्कुटीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्याशी बोलण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याचा बदाम, सोन्याची पेटी आणि कानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेत आरोपींनी पलायन केले. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गोपनीय माहितीवरून आरोपी जाळ्यात!

पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली LCB चे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या गुन्ह्यात पंढरपूर येथील आशु दत्ता जाधव (वय २५) याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने साथीदार सोमनाथ धोंडीराम पोरे याच्यासोबत गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

सोन्याचे दागिने आणि दुचाकी जप्त

पोलिसांनी या कारवाईत ९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ज्यांची किंमत १ लाख २८ हजार ४०० रुपये आहे, तसेच गुन्ह्यात वापरलेली सुझुकी अॅक्सेस १२५ दुचाकी, अंदाजे किंमत १ लाख रुपये, असा एकूण २ लाख २८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अटक केलेला आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी जत पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील दुसरा संशयित सोमनाथ पोरे फरार असून, पुढील तपास जत पोलीस करीत आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली असून, ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

No comments:

Powered by Blogger.