कापड दुकानातील वाद अन् मोडलेल्या लग्नाचा राग! ईश्वरपुरात तरुणाची निर्घृण हत्या; दोघे आरोपी २४ तासांत जेरबंद!
कापड दुकानातील वाद अन् मोडलेल्या लग्नाचा राग! ईश्वरपुरात तरुणाची निर्घृण हत्या; दोघे आरोपी २४ तासांत जेरबंद!
कोयता आणि धारदार शस्त्रांनी डोके, चेहरा, पोट व पाठीवर सपासप वार; कासेगाव महामार्गावर पोलिसांनी आवळल्या मुसक्या!
ईश्वरपूर | प्रतिनिधी
कापड दुकानात झालेल्या वादाचे पर्यवसान थेट रक्तरंजित हत्येत झाल्याची धक्कादायक घटना ईश्वरपूर येथील आंबेडकरनगर परिसरात घडली. पूर्वी मोडलेल्या लग्नाचा राग आणि दुकानातील भांडणाचा वाद मनात धरून ३१ वर्षीय सुरज महादेव कांबळे याची कोयता व चाकूसारख्या धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या खळबळजनक प्रकरणातील साहिल अनिल कांबळे (वय २७) आणि अंकित मुकुंद कांबळे (वय ३०) या दोघांना सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि ईश्वरपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने अवघ्या २४ तासांत कासेगाव परिसरातून अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे नऊच्या सुमारास कापड दुकानात आरोपी आणि सुरज कांबळे यांच्यात वाद झाला होता. त्याचबरोबर पूर्वी लग्न मोडल्याचा रागही मनात होता. याच कारणातून आरोपींनी संगनमत करून सुरजवर लोखंडी कोयता आणि चाकूसारख्या धारदार शस्त्रांनी डोके, कपाळ, चेहरा, पोट आणि पाठीवर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुरजचा मृत्यू झाला.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले. ईश्वरपूर पोलिसांच्या पथकानेही समांतर तपास सुरू केला.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना कासेगाव शहर परिसरात, कराड महामार्गालगत असलेल्या हॉटेल ९६ कुळीसमोरील रस्त्यावर दोन्ही संशयित आरोपी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून साहिल कांबळे आणि अंकित कांबळे या दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान दोघांनी सुरजसोबत झालेल्या वादातून आणि पूर्वी लग्न मोडल्याच्या कारणावरून हल्ला केल्याची माहिती पोलिसांना दिल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे. त्यानंतर दोघांना पुढील तपासासाठी ईश्वरपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ३(५) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.
दरम्यान, किरकोळ वाद आणि वैयक्तिक आकसातून एका तरुणाचा जीव गेल्याने ईश्वरपूर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या जलद कारवाईमुळे दोन्ही संशयित आरोपी २४ तासांत जेरबंद झाले असले, तरी या हत्येमागील नेमकी पार्श्वभूमी आणि इतर बाबींचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.

No comments: