खारेपाटणच्या लेकीची गगनगिरी गडावर कला-साधना; १८ तासांत साकारली सहा फुटी भव्य रांगोळी!
खारेपाटणच्या लेकीची गगनगिरी गडावर कला-साधना; १८ तासांत साकारली सहा फुटी भव्य रांगोळी!
कळे प्रतिनिधी | साईश मोळे
गगनबावडा : कोजागिरी पौर्णिमेच्या पर्वावर गगनगिरी गडावर खारेपाटणच्या कन्या श्वेता इस्कार हिने आपल्या कलेतून भक्तीचा अनोखा आविष्कार घडवला. सलग १८ तासांच्या अथक परिश्रमानंतर तिने गगनगिरी महाराजांची सहा फूट उंच आणि पाच फूट रुंद भव्य रांगोळी साकारली.
२४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता सुरू केलेली ही कलासाधना २५ ऑक्टोबर रोजी पहाटे ६ वाजून २३ मिनिटांनी पूर्ण झाली. मदतीला कोणी नसताना आणि दिव्यांच्या प्रकाशाकडे आकर्षित होणाऱ्या किड्यांमुळे रांगोळी खराब होत असतानाही श्वेताने जिद्द सोडली नाही.
तिच्या या अद्वितीय कलेचे गडावरील सेवेकरी आणि भाविकांनी भरभरून कौतुक केले. सेवेकऱ्यांनी पैठणी व श्रीफळ देऊन तिचा सन्मान केला. तसेच गगनगिरी महाराजांचे वंशज संजय पाटणकर सरकार यांनीही साडी व श्रीफळ देऊन तिचा गौरव केला.
जिद्द, भक्ती आणि कलेचा सुंदर संगम घडवणाऱ्या श्वेता इस्कारच्या या रांगोळीने गगनगिरी गडावर भाविकांचे लक्ष वेधून घेतले.

No comments: