Header Ads

पुसद शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

 पुसद शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नगर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी.

 सिद्धार्थ कदम

पुसद तालुका प्रतिनिधी

पुसद शहरातील विविध भागांत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील रस्ते, चौक तसेच वर्दळीच्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने पादचारी, दुचाकीस्वार, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या मागे कुत्रे धावणे, अचानक रस्त्यावर येणे तसेच पादचाऱ्यांच्या अंगावर धावून जाणे अशा प्रकारांमुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना अधिक सावधगिरी बाळगावी लागत आहे.

मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी नियमानुसार निर्बीजीकरण, लसीकरण आणि आवश्यक पशुवैद्यकीय उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.

त्यामुळे पुसद नगर प्रशासनाने मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे .

No comments:

Powered by Blogger.