Header Ads

दाजीपूर अभयारण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन! पर्यटकांच्या कॅमेऱ्यात वाघ कैद; आनंदासोबतच भीतीचे वातावरण

 दाजीपूर अभयारण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन! पर्यटकांच्या कॅमेऱ्यात वाघ कैद; आनंदासोबतच भीतीचे वातावरण

पाणवठ्याजवळ वाघाची अनपेक्षित एंट्री; पर्यटकांनी केले व्हिडिओ शूटिंग, वन्यजीवप्रेमींमध्ये उत्सुकता.


राधानगरी प्रतिनिधी | विजय बकरे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचे वैभव आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध वन्यजीव पर्यटनस्थळ असलेल्या दाजीपूर अभयारण्यात सोमवारी सकाळी पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये एकच उत्सुकता निर्माण झाली. पाणवठ्याजवळ अचानक वाघ दिसल्याने पर्यटकांनी आश्चर्य आणि आनंद व्यक्त केला. मात्र, वाघाच्या उपस्थितीमुळे काही पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरणही निर्माण झाले.

पावसाळ्यानंतर १ नोव्हेंबरपासून दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यानंतर सोमवारी अभयारण्य सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांच्या वाहनाला सावरा सडा परिसरात पाण्याजवळ पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. जंगलाच्या निसर्गरम्य वातावरणात अचानक समोर आलेल्या या वाघाला पाहून पर्यटक सुखावले.

या दुर्मीळ क्षणाचे पर्यटकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात व्हिडिओ शूटिंग करून चित्रीकरण केले. जंगलाचा राजा प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्याने पर्यटकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, अभयारण्यात वाघाचा वावर असल्याचे समोर आल्याने आगामी काळात येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये उत्सुकतेसोबतच सावधगिरीची भावना निर्माण झाली आहे.

दाजीपूरच्या जंगलात वाघाचा वावर असल्याचे या दर्शनामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, वन्यजीवप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे. पर्यटकांनी मात्र वनविभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन महत्त्वाचे ठरणार आहे.

No comments:

Powered by Blogger.