हातात तलवार, बसस्थानकावर दहशत! उमरखेड पोलिसांनी आरोपीला पकडले
हातात तलवार, बसस्थानकावर दहशत! उमरखेड पोलिसांनी आरोपीला पकडले
धारदार लोखंडी तलवार आणि म्यान जप्त; रेकॉर्डवरील २४ वर्षीय आरोपीवर भारतीय हत्यार कायद्यान्वये कारवाई.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातात धारदार लोखंडी तलवार घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला उमरखेड पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. या कारवाईत तलवार आणि तिची म्यान असा एकूण ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी उमरखेड पोलीस ठाण्याचे डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व त्यांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सुकळी जहागीर येथील नागपूर-तुळजापूर महामार्गावरील बसस्थानक परिसरात एक इसम हातात धारदार तलवार घेऊन येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे.
या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास आयफाजौद्दीन उर्फ गौसौद्दीन मुजीबोद्दीन काझी (वय २४, रा. सुकळी जहागीर, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून ३२ इंच लांबीची, १.५ इंच रुंदीची पितळी मुठ असलेली धारदार लोखंडी तलवार आणि तिची म्यान असा एकूण ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, घातक शस्त्रे, अग्निशस्त्रे किंवा अन्य बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्यांची माहिती नागरिकांनी तातडीने उमरखेड पोलीस ठाण्याला द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी गौरव कांयदेपाटील, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मी मलकुवार आणि सहायक पोलीस निरीक्षक अमोल गुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, सहायक फौजदार मधुकर पवार, पोलीस हवालदार चंदन जाधव, पोलीस कॉन्स्टेबल विष्णू राठोड व चालक पोलीस कॉन्स्टेबल रुद्रा वानखेडे यांनी सहभाग घेतला.

No comments: