हुपरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई! परराज्यातील दुचाकी चोर जेरबंद; ८० हजारांच्या दोन मोटारसायकली हस्तगत
हुपरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई! परराज्यातील दुचाकी चोर जेरबंद; ८० हजारांच्या दोन मोटारसायकली हस्तगत
गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून संशयिताला घेतले ताब्यात; दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस.
हुपरी : मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी हुपरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने धडाकेबाज कारवाई केली आहे. परराज्यातील कर्नाटकच्या एका संशयिताला ताब्यात घेत त्याच्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकलींसह एकूण ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईत दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२७/२०२६ नुसार सौरव सुजीत आवटे (रा. हुपरेनगर, पट्टणकोडोली) यांची स्प्लेंडर मोटारसायकल ३० ऑक्टोबर रोजी चोरीस गेली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू होता.
दरम्यान, गुन्हे शोध पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी एक व्यक्ती येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून गजानंद दुड्डाप्पा मगदुम (वय ३८, रा. बेनीवाड रोड, मदमक्कनल, जि. बेळगाव, कर्नाटक) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या.
या कारवाईमुळे हुपरी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक २२७/२०२६ आणि २२८/२०२६ असे दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपास हुपरी पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव व इचलकरंजी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे, पोलीस हवालदार विजय कांबळे तसेच पोलीस अंमलदार पवन गुरव, सुकुमार बरगाले, भरत कोरवी, युवराज गोडसे, सचिन करपे, विजय मगदुम व होमगार्ड किरण पवार यांचा सहभाग होता.
गोपनीय माहिती, पोलिसांचा सापळा आणि अचूक कारवाई यामुळे दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आल्याने हुपरी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

No comments: