कुपवाड स्वामी मळा येथील 'शाहू फुले आंबेडकर उद्यान' दुरवस्थेच्या गर्तेत; तुटलेला बोर, वाढलेले गवत आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतापले
कुपवाड स्वामी मळा येथील 'शाहू फुले आंबेडकर उद्यान' दुरवस्थेच्या गर्तेत; तुटलेला बोर, वाढलेले गवत आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतापले.
कुपवाड (प्रतिनिधी):
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधील कुपवाड, स्वामी मळा येथील 'शाहू फुले आंबेडकर उद्यानाची' सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. महापालिका प्रशासनासह प्रभाग क्रमांक २ चे माननीय नगरसेवक आणि माननीय उपमहापौर गजानन मगदूम, तसेच नगरसेविका प्राजक्ता धोत्रे, मालुश्री खोत आणि नगरसेवक प्रकाश पाटील यांचे या उद्यानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून, स्थानिक समस्यांकडे ते जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा संतप्त आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
स्वामी मळा परिसरातील नागरिक आणि लहान मुलांसाठी विरंगुळ्याचे हक्काचे ठिकाण असलेल्या या उद्यानात मूलभूत सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. उद्यानात पिण्याच्या पाण्यासाठी मारण्यात आलेला बोर तुटलेल्या अवस्थेत असून, त्याची कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना व मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
याशिवाय, उद्यानात मोठ्या प्रमाणात गवत आणि काटेरी झुडपे वाढली असून, सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. लहान मुलांसाठी बसवण्यात आलेल्या खेळण्यांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे आणि बहुतांश साहित्य गंजून खराब झाले आहे. तसेच, उद्यानात पथदिव्यांची (दिवाबत्तीची) कोणतीही सोय नसल्याने सायंकाळनंतर येथे पूर्णपणे अंधार असतो, ज्यामुळे गैरप्रकार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
कुपवाड आणि स्वामी मळा भागातील विकासाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली असून, महापुरुषांच्या नावाने असलेल्या या उद्यानाची अशी हेळसांड होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. महापालिका प्रशासन आणि संबंधित माननीय नगरसेवकांनी तातडीने तुटलेला बोर दुरुस्त करावा, वाढलेले गवत काढून स्वच्छता करावी, खराब खेळणी बदलावीत आणि पथदिव्यांची सोय करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. याकडे लवकरात लवकर लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

No comments: