मराठीच्या वैभवाचा खरा ठेवा बोलीभाषा! संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – आबासाहेब कडू
मराठीच्या वैभवाचा खरा ठेवा बोलीभाषा! संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – आबासाहेब कडू
अमरावतीत पहिले राष्ट्रीय बोलीभाषा साहित्य संमेलन उत्साहात; पुष्पराज गावंडे यांना जीवनगौरव पुरस्कार, १० साहित्यिकांचा गौरव!
अमरावती | पी. एन. देशमुख, जिल्हा प्रतिनिधी
मराठी भाषेचे खरे वैभव तिच्या विविध बोलीभाषांमध्ये दडलेले आहे. वऱ्हाडी, कोकणी, मालवणी, अहिराणी, झाडीबोली अशा बोलीभाषा म्हणजे समृद्ध लोकसंस्कृती आणि परंपरेचा अनमोल ठेवा आहे. हा वारसा टिकविण्यासाठी बोलीभाषांचे जतन व संवर्धन होणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वऱ्हाडी साहित्यिक तथा संमेलनाध्यक्ष आबासाहेब कडू यांनी केले.
अकोला येथील बोलीभाषा साहित्य संस्थेच्या वतीने २२ नोव्हेंबर रोजी अमरावतीतील कर्मयोगी संत गाडगेबाबा समाधी मंदिरात पहिले राष्ट्रीय बोलीभाषा साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. डॉ. शोभाताई रोकडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी विविध राज्यांतील साहित्यिक, कवी आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सजवलेली बैलगाडी आणि बंजारा महिलांचे पारंपरिक नृत्य हे ग्रंथदिंडीचे विशेष आकर्षण ठरले. संमेलनात ज्येष्ठ कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांना 'बोलीभाषा जीवनगौरव पुरस्कार २०२६' प्रदान करण्यात आला. तसेच विविध बोलीभाषांतील आठ साहित्यिकांना साहित्यरत्न पुरस्कार, तर डॉ. मनोहर घुगे यांना वैद्यकीय सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
तीन कविसंमेलने, साहित्यिक पुरस्कार वितरण आणि विविध बोलीभाषांतील काव्य सादरीकरणाने संमेलन रंगले. प्रा. महादेव लुले (देवबाबू) यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमाने विविध बोलीभाषांतील साहित्यिकांना एकाच व्यासपीठावर आणले.
बोलीभाषा जपल्या तरच मराठी संस्कृतीचा वारसा जपला जाईल, हा महत्त्वपूर्ण संदेश देत अमरावतीतील पहिले राष्ट्रीय बोलीभाषा साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले.

No comments: