Header Ads

विकासवाडी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला ऐतिहासिक नाव देण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन.

 विकासवाडी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला ऐतिहासिक नाव देण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन.

--------------------------------------

दि. १३ फेब्रुवारी २०२६ | कोल्हापूर

अखिल भारत हिंदू महासभा कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने विकासवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या नामकरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. हे निवेदन राजेंद्र तोरसकर यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले असून स्टेडियमला ऐतिहासिक व राष्ट्रप्रेरक व्यक्तिमत्त्वाचे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले की, कोल्हापूर जिल्ह्यातील विकासवाडी परिसरात उभारण्यात येणारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हे सार्वजनिक निधीतून उभारले जात असल्याने त्याचे नामकरण सामाजिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक जबाबदारी लक्षात घेऊन व्हावे. त्यासाठी “छत्रपती ताराराणी महाराणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम” किंवा पर्यायी स्वरूपात “विनायक दामोदर सावरकर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम” अशी नावे सुचविण्यात आली आहेत.

निवेदनात भारतीय राज्यघटनेतील कलम १६२ व ५१अ यांचा संदर्भ देत सार्वजनिक प्रकल्पांच्या नामकरणात ऐतिहासिक वारसा, राष्ट्रीय अभिमान व सामाजिक ऐक्य यांचा विचार होणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाने सदर मागणीचा सकारात्मक विचार करून शासनस्तरावर प्रस्ताव सादर करावा व आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी अभिजीत पाटील, शीलाताई माने, रश्मीताई साळोखे, सुनील सामंत, पूजा शिंदे, अजय सोनवणे व सुरेश जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

👉 ऐतिहासिक वारशाला साजेसा निर्णय घेऊन स्टेडियमला प्रेरणादायी नाव द्यावे, अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

No comments:

Powered by Blogger.