भेळ व्यवसायातून सुरू झालेला प्रवास; शुभांगी कुंभार बनल्या जिल्हा परिषद सदस्या.
भेळ व्यवसायातून सुरू झालेला प्रवास; शुभांगी कुंभार बनल्या जिल्हा परिषद सदस्या.
-------------------------------------
अंबप : किशोर जासूद
------------------------------------
तळसंदे (ता. ___) येथील सर्वसामान्य कुटुंबातील शुभांगी महेश कुंभार यांनी संघर्ष, जिद्द आणि लोकसंपर्काच्या जोरावर जिल्हा परिषद सदस्या पदापर्यंत मजल मारत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. भेळ-पाणीपुरी व्यवसाय करणाऱ्या पतीच्या सोबत उभे राहत त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
महेश कुंभार यांनी २००६ पासून गावात भेळ-पाणीपुरी व्यवसाय करत तळागाळातील नागरिकांच्या समस्या जवळून अनुभवल्या. व्यवसायासोबत इंटरनेट कॅफे व फोटोग्राफी क्षेत्रातही त्यांनी काम सुरू केले. २०१३ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत अवघ्या दोन मतांनी पराभव झाला तरी त्यांनी हार मानली नाही. २०१७ मध्ये पुन्हा निवडणूक लढवत ते सदस्य झाले व पुढे उपसरपंच पदाची जबाबदारीही सांभाळली. विशेषतः कोरोना काळात केलेल्या कामांची गावात मोठी दखल घेतली गेली.
जनतेचा विश्वास संपादन करत २०२२ मध्ये शुभांगी कुंभार यांची तळसंदे गावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच म्हणून निवड झाली. तीन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी गावातील विविध प्रश्न मार्गी लावत कोट्यवधी रुपयांची विकासकामे राबवली.
दरम्यान, घुणकी जिल्हा परिषद मतदारसंघ ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर शुभांगी कुंभार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. आर्थिक अडचणी असूनही त्यांनी धाडसाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी केली. मतदारसंघातील घराघरांत जाऊन संवाद साधत त्यांनी जनतेचा विश्वास जिंकला आणि अखेर जिल्हा परिषद सदस्या म्हणून निवडून येत यशाची नवी उंची गाठली.
सामान्य कुटुंबातून राजकारणात प्रवेश करून जिद्द, मेहनत आणि लोकसेवेच्या बळावर मिळवलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

No comments: