Header Ads

*श्रीक्षेत्र गगनगडावर "गगनगड परिक्रमा" चे भव्य आयोजन!*

 *श्रीक्षेत्र गगनगडावर "गगनगड परिक्रमा" चे भव्य आयोजन!*

~~~~~~~~~~~~~~~

  कळे प्रतिनिधी

साईश मोळे

 ~~~~~~~~~~~~~~~ 

कळे:- सालाबादप्रमाणे याही वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील श्री क्षेत्र गगनगडावर,स्वामी गगनगिरी महाराज आश्रम गगनगड यांचे वतीने "गगनगड परिक्रमा"  या धार्मिक सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.


      या गगनगड परिक्रमेस रविवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सकाळी प्रारंभ होणार असून सायंकाळपर्यंत त्याची सांगता होणारअसून सकाळी पादुकांवर विधीवत पूजा-अभिषेक झाल्यावर, सदर पादुका समवेत गगनगड परिक्रमेस प्रारंभ होईल.


     सदर परिक्रमा गगनगडाच्या पायथ्यापासून निघून करूल घाट मार्गे भुईबावडा येथील रिंगेवाडी येथे दुपारी विश्रांती साठी थांबेल तिथे भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून नंतर परिक्रमा गडाचे दिशेने वळसा घालून म्हसोबास्थान मार्गे मर्द किल्ले गगनगडावर येईल.


संपूर्ण परिक्रमेस ८ ते ९ तास लागणार असून अंदाजे २२ कि.मी.चे वर अंतर असून रस्ता  डोंगराळ भागातून जातो. संपूर्ण परिक्रमेमध्ये विविध भागातून भाविकजन व भजनी मंडळी सहभागी होणार आहेत.


     स्वामी गगनगिरी महाराज जेव्हा गडावर जात,त्यावेळेस जिथे विश्रांती साठी थांबत त्या रिंगेवाडी येथील गगनगिरी विश्रामधामात भोजन व्यवस्था ठेवण्यात आली आहे.


     गगनगड परिक्रमा आश्रमस्थानी आल्यावर महाआरती होणार असून त्यानतंर सर्वाना महाप्रसाद देण्यात येईल. 


     सदर परिक्रमेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रांतील महाराजांच्या विविध आश्रमातून सेवेकरी व भाविक भक्तमंडळी येणार असून अनेक आश्रम प्रमुख व मठाधिपतीही उपस्थित राहणार आहेत.

 

       स्वामी गगनगिरी महाराज आपल्या या गगनगड परिक्रमेचे महत्व व माहात्म्य जाणून होते. म्हणून ते आपल्या भक्तांना नेहमी म्हणत,ज्या कोणाला नर्मदा नदी परिक्रमा, कृष्णा नदी परिक्रमा अथवा गिरनार परिक्रमा करणे शक्य होत नसेल त्यांनी पुण्यदायक अशी गगनगड परिक्रमा अवश्य करावी,महाराजांचे आदेशाने व प्रेरणेमुळे दिवसेंदिवस भक्तांचा गगनगड परिक्रमेस भरघोस प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.


    या परिक्रमेच्या पार्श्वभूमीवर स्वामी गगनगिरी महाराजांचे ओणी आश्रम प्रमुख आदरणीय,नाथयोगी उल्हासगिरी महाराजांनी," नर्मदेच्या परिक्रमे सम,पुण्य लाभते सत्वरी!

गगनगडाच्या परिक्रमे ची, महती सांगती गगनगिरी!!"

हे भक्तीमय प्रेरणादायक गीत तयार करून यू ट्यूब (You Tube) वर उपलब्ध करून दिले आहे.


     सदरहू धार्मिक कार्यक्रम यथासांग पार पडण्यासाठी श्रीक्षेत्र गगनगडावरील सेवेकरी मंडळी तसेच गगनगडाचे आजूबाजूकडील आश्रमांतील भक्तमंडळी व सेवेकरी सतत सेवारत राहून सेवाकार्य करीत आहेत.


    अशा या पराक्रम व भक्तीला साथ देणाऱ्या " गगनगड परिक्रमा" पदयात्रे मध्ये जास्तीत-जास्त भाविक भक्तांनी व गगनगिरी सेवेकरी मंडळींनी सहभागी होऊन सक्रीय सहकार्य करावे,व "गगनगड परिक्रमा" हा कार्यक्रम यशस्वी व संस्मरणीय करावा,असे आवाहन मर्द किल्ले गगनगड आश्रम प्रमुख संजयसिंह पाटणकर, रमेश माने, व बापूसाहेब पाटणकर यांनी केले आहे,असे गगनगिरी सेवेकरी सुरेंद्र देशमुख कळवितात.

No comments:

Powered by Blogger.