Header Ads

साजणीमध्ये बनावट एचएसआरपी नंबर प्लेट प्रकरण उघड; एलसीबी-पोलीसांची संयुक्त धडक कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त.

 साजणीमध्ये बनावट एचएसआरपी नंबर प्लेट प्रकरण उघड; एलसीबी-पोलीसांची संयुक्त धडक कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त.

--------------------------------

संस्कार कुंभार.

--------------------------------

दि. १३ फेब्रुवारी २०२६ | साजणी (ता. हातकणंगले)

साजणी येथे बेकायदेशीररीत्या एचएसआरपी नंबर प्लेट तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत कोल्हापूर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा व हातकणंगले पोलिसांनी संयुक्त धडक कारवाई केली. श्री साई रेडीयम आर्ट्स या दुकानावर टाकलेल्या छाप्यात सुमारे ४ लाख ६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संतोष बबन यादव (वय ३१) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत शासन किंवा अधिकृत मोटार वाहन विभागाची परवानगी नसताना एचएसआरपी नंबर प्लेट तयार केल्या जात असल्याचे उघड झाले. आरोपी वाहनधारकांना बनावट नंबर प्लेट खऱ्या असल्याचे सांगून पैसे उकळत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

छाप्यात एम्बॉस मशीन, फाईल हिटर मशीन, ३३ एचएसआरपी प्लेट, १३२ काळ्या व १८२ पांढऱ्या डाय, ४०२ स्टिकर्स, INDIA प्लास्टिक रोल, रोख रक्कम व मोबाईल हँडसेट असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक, डीवायएसपी तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. साजणी परिसरातील या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर नंबर प्लेट व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.