आखदवाडा येथे ७ दिवसीय भागवत सप्ताहाची भव्य मिरवणुकीने सांगता ३३ वर्षांची अखंड परंपरा कायम; हनुमान जयंतीनिमित्त भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग
आखदवाडा येथे ७ दिवसीय भागवत सप्ताहाची भव्य मिरवणुकीने सांगता
३३ वर्षांची अखंड परंपरा कायम; हनुमान जयंतीनिमित्त भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग.
--------------------------------चांदूर बाजार (अमरावती) प्रतिनिधी :
---------------------------------
चांदूर बाजार तालुक्यातील आखदवाडा येथे हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ७ दिवसीय भागवत सप्ताहाची भव्य मिरवणुकीने उत्साहात सांगता करण्यात आली. गावातील भाविकांनी मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने या सप्ताहात सहभाग घेतला.
या भागवत सप्ताहाची परंपरा गेल्या तब्बल ३३ वर्षांपासून अखंडपणे सुरू असून, याची सुरुवात ह.भ.प. गुरुवर्य ब्रह्मचारी श्री. वसंत महाराज महाजन यांच्या पवित्र वाणीतून करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली ही धार्मिक परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने पुढे नेली जात आहे.
सध्या त्यांच्या शिष्य ह.भ.प. श्री. अरुणजी महाराज दीक्षित यांच्या वाणीतून भागवत कथामृताचे रसाळ निरूपण होत असून, गावातील व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने याचा लाभ घेत आहेत. सातही दिवस हरिनाम संकीर्तन, प्रवचन, भजन आणि कीर्तन यामुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
सप्ताहाच्या सांगता दिवशी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत पालखी, टाळ-मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करण्यात आला. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत फुगड्या खेळत सहभाग नोंदविला, तर युवकांनी शिस्तबद्ध मिरवणूक काढून कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.
या धार्मिक सोहळ्यामुळे आखदवाडा गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी एकत्र येत परंपरेचे जतन केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

No comments: