मोबाईलच्या पैशावरून वाद; अतिग्रेतील विनोद मुसळेचा दगडाने ठेचून खून चोकाक पुलाखाली मित्राकडूनच हल्ला; संशयित फरार, पोलिसांचा शोध सुरु
मोबाईलच्या पैशावरून वाद; अतिग्रेतील विनोद मुसळेचा दगडाने ठेचून खून
चोकाक पुलाखाली मित्राकडूनच हल्ला; संशयित फरार, पोलिसांचा शोध सुरु.
कोल्हापूर प्रतिनिधी :
हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील विनोद उर्फ लालू सर्जेराव मुसळे (वय 30) याचा मोबाईल खरेदीच्या पैशांवरून झालेल्या वादातून दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळी कोल्हापूर–सांगली मार्गावरील चोकाक येथील पुलाखाली ही घटना उघडकीस आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनोद मुसळे हा ठेकेदारी काम करत होता. गुरुवारी सायंकाळी तो चोकाक येथील पुलाखाली मित्र तुषार रवींद्र लोहार (वय 35, रा. चोकाक) याच्यासोबत मद्यपान करत बसला होता. यावेळी मोबाईल खरेदीच्या रकमेवरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद काही वेळातच तीव्र झाल्याने संतापाच्या भरात तुषार लोहार याने मुसळे यांच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले.
हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. दरम्यान, तेथे असलेल्या कामगारांनी तात्काळ हातकणंगले पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक शरद मेमाणे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमी मुसळे यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठवले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक आप्पासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली. चोकाक पुलाखालील परिसरात व्यसनी लोकांचा वावर असल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.
दरम्यान, संशयित तुषार लोहार याच्या अटकेसाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेमुळे अतिग्रे व चोकाक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

No comments: