Header Ads

रुईकर कॉलनीत आराम बसला अचानक आग; पुढील भाग जळून खाक, तावडे हॉटेलकडून शहराकडे जाणाऱ्या मार्गावर खळबळ; सुदैवाने जीवितहानी टळली.

 रुईकर कॉलनीत आराम बसला अचानक आग; पुढील भाग जळून खाक, तावडे हॉटेलकडून शहराकडे जाणाऱ्या मार्गावर खळबळ; सुदैवाने जीवितहानी टळली.

---------------------------

कोल्हापूर / प्रतिनिधी.

शशिकांत कुंभार.

-------------------------------

कोल्हापूर शहरातील रुईकर कॉलनी परिसरात सोमवारी सकाळी एका खासगी आराम बसला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. तावडे हॉटेलकडून शहराच्या दिशेने जाणाऱ्या मध्यवर्ती रस्त्यावर हॉटेल नैवेद्यसमोर सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, आराम बस रस्त्यावरून जात असताना अचानक बसच्या पुढील भागातून धूर येऊ लागला. त्यानंतर काही क्षणांतच आगीच्या ज्वाला भडकल्या. चालक व संबंधितांनी प्रसंगावधान राखत बस थांबविल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, आगीचा भडका वाढत गेल्याने बसचा पुढील बराचसा भाग जळून खाक झाला.आगीच्या प्रचंड ज्वाला आणि धुराचे लोट आकाशात मोठ्या प्रमाणात दिसत असल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. खबर मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, आगीमुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन या मार्गावरील वाहतूक काही काळ विरुद्ध दिशेने वळविण्यात आली. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली होती.

उष्णतेची तीव्रता वाढत असताना शहरात वाहनांना अचानक आग लागण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. दोनच दिवसांपूर्वी ताराराणी चौक परिसरात रात्री एका खासगी कारला अचानक आग लागून वाहनाचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर आता आराम बसला आग लागल्याने वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, अग्निशमन दल व संबंधित यंत्रणांकडून घटनेची माहिती घेण्यात येत आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

No comments:

Powered by Blogger.