परखंदळेत रक्तदानाने फेडले सामाजिक ऋण; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त निळा रक्षक मंडळाचा उपक्रम उत्साहात*
*परखंदळेत रक्तदानाने फेडले सामाजिक ऋण; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त निळा रक्षक मंडळाचा उपक्रम उत्साहात*
-----------------
पन्हाळा प्रतिनिधी
माधुरी मस्कर
------------------
* विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त निळा रक्षक तरुण मंडळ परखंदळे ( ता. पन्हाळा )यांच्या वतीने आज शुक्रवार दि. 17 एप्रिल 2026 रोजी सिद्धार्थ नगर येथे आयोजित भव्य रक्तदान शिबीर हजारोंच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. "काही नाती रक्ताची नसली तरी रक्ताने जोडता येतात" हा संदेश देत असंख्य नागरिक, तरुण-तरुणी आणि महिलांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून समाजसेवेचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला.
सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या या शिबिरात रक्तदानाचे महत्त्व पटवून देताना आयोजकांनी सांगितले की, रक्त हे कृत्रिमरित्या तयार करता येत नाही व मानवी रक्ताला कोणताही पर्याय नाही. केवळ 10 मिनिटांत होणाऱ्या या प्रक्रियेत शरीरातील 6 लिटर रक्तापैकी फक्त 350 मि.ली. रक्त घेतले जाते, जे 48 तासात नैसर्गिकरित्या पुन्हा तयार होते. एका रक्तदात्यामुळे 3 लोकांना जीवनदान मिळते, त्यामुळे दर 3 महिन्यांनी नियमित रक्तदान करणे हे प्रत्येक सजग नागरिकाचे कर्तव्य आहे. रक्तदान ही पूर्णपणे सुरक्षित, वेदनारहित व आनंददायी प्रक्रिया आहे.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी निळा रक्षक तरुण मंडळाचे कार्यकर्ते अभिजित कांबळे, अनिकेत कांबळे, अमित कांबळे, आदित्य कांबळे यांच्यासह अनेक तरुणांनी अथक परिश्रम घेतले. वैद्यकीय पथकाकडून प्रत्येक रक्तदात्याची संपूर्ण तपासणी करूनच रक्त संकलित करण्यात आले. जयंती कमिटीच्या वतीने सर्व रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू असलेल्या या शिबिराला गावकऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.
डॉ. आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त मंडळाने सलग तीन दिवस कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रक्तदान शिबिरानंतर उद्या मंगळवार दि. 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता याच ठिकाणी 'भव्य खुल्या हालगी वादन स्पर्धा' होणार आहे. प्रथम क्रमांकासाठी 7001/- रुपये व शिल्ड असे एकूण सहा आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. एका संघात एक घुमके, एक हालगी व एक झांज असे तीन स्पर्धक असतील व पंचांचा निर्णय अंतिम राहील.
याच सोहळ्याचा भाग म्हणून शनिवार दि. 19 एप्रिल 2026 रोजी सायं 5:15 ते 7 या वेळेत क्रांतिबा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छ. शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती उत्सवाप्रित्यर्थ "लय भारी होम मिनिस्टर कार्यक्रम - खेळ पैठणीचा" हा स्त्री शक्तीचा सन्मान करणारा सोहळा होणार आहे. सुप्रसिद्ध निवेदक विकी मगदूम (बामणीकर) यांच्या सूत्रसंचालनात होणाऱ्या या कार्यक्रमात विजेत्यांसाठी मानाची पैठणी, मिक्सर, टेबल फॅन अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
निळा रक्षक तरुण मंडळाच्या या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

No comments: