Header Ads

कोल्हापूर जिल्हा SQAAF स्वयंमूल्यांकनात राज्यात तिसऱ्या क्रमांकावर २,८५६ शाळांनी पूर्ण केली स्वयंमूल्यांकन प्रक्रिया; गुणवत्ता वृद्धीसाठी शिक्षण विभागाचा निर्धार.

 कोल्हापूर जिल्हा SQAAF स्वयंमूल्यांकनात राज्यात तिसऱ्या क्रमांकावर २,८५६ शाळांनी पूर्ण केली स्वयंमूल्यांकन प्रक्रिया; गुणवत्ता वृद्धीसाठी शिक्षण विभागाचा निर्धार.

---------------------

कोल्हापूर प्रतिनिधी:

संस्कार कुंभार.

----------------------

शाळांच्या गुणवत्तेचे एकसमान व प्रभावी मूल्यांकन करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यातील ३,६७४ शाळांपैकी तब्बल २,८५६ (७७.७४ टक्के) शाळांनी स्वयंमूल्यांकन प्रक्रिया पूर्ण केली असून ही कामगिरी शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानास्पद मानली जात आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षामार्फत SQAAF हा आराखडा विकसित करण्यात आला आहे. या आराखड्याअंतर्गत सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांचे स्वयंमूल्यांकन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्तर, शिक्षकांचे अध्यापन कौशल्य, पायाभूत सुविधा, सुरक्षितता, समावेशकता तसेच शाळा व्यवस्थापन समितीचा सहभाग अशा विविध घटकांचा या प्रक्रियेत समावेश आहे.

सन २०२५-२६ साठी स्वयंमूल्यांकन पूर्ण करण्याची अंतिम मुदत १५ एप्रिल २०२६ होती. या कालावधीत राज्यातील १,०८,०९२ शाळांपैकी ४९,८४४ (४६.११ टक्के) शाळांनी प्रक्रिया पूर्ण केली. कोल्हापूर जिल्ह्याने या स्पर्धेत आघाडी घेत तिसरे स्थान मिळवले आहे. दरम्यान, उर्वरित शाळांना स्वयंमूल्यांकन पूर्ण करण्यासाठी १ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

याबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. मीना शेंडकर यांनी सांगितले की, “राज्यात तिसरा क्रमांक मिळवणे ही कोल्हापूरसाठी अभिमानाची बाब आहे. स्वयंमूल्यांकन ही केवळ औपचारिक प्रक्रिया नसून शाळांनी स्वतःच्या उणिवा ओळखून सुधारणा करण्याचा प्रभावी मार्ग आहे. या यशामागे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन तसेच शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षण कर्मचाऱ्यांचे प्रामाणिक प्रयत्न आहेत.”

या यशाबद्दल जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिल्पा शशिकांत खोत, उपाध्यक्ष तानाजी कृष्णात पाटील आणि शिक्षण व अर्थ समिती सभापती सौ. शितल प्रविण यादव यांच्या मार्गदर्शनाचीही नोंद घेण्यात आली आहे.

दरम्यान, १७ एप्रिल २०२६ रोजी राज्यस्तरीय व्हिडिओ कॉन्फरन्समध्येही कोल्हापूर जिल्ह्याच्या या कामगिरीचे विशेष कौतुक करण्यात आले. या यशामुळे जिल्ह्यातील शाळांमध्ये गुणवत्ता संस्कृती अधिक बळकट झाली असून भविष्यात राज्यात अव्वल स्थान मिळवण्याचा निर्धार शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.

No comments:

Powered by Blogger.