कवलापूर येथे किरकोळ वादातून खून; आरोपी २४ तासांत जेरबंद.
कवलापूर येथे किरकोळ वादातून खून; आरोपी २४ तासांत जेरबंद.
-**********************-सिद्धेश्वर मंदिर परिसरातील घटना; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तात्काळ कारवाई.
सांगली, दि. ६ एप्रिल (प्रतिनिधी) – कवलापूर (ता. मिरज) येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी अवघ्या काही तासांत जेरबंद केले आहे.
याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १०१/२०२६, भा.न्या.सं. कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ६ एप्रिल रोजी पहाटे सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास कवलापूर येथील सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस ही घटना घडली. विश्वास कल्लाप्पा सुतार (वय ३४, रा. भोसे, सध्या कवलापूर) यांनी आरोपी रोहित ऊर्फ नवनाथ श्रीरंग नाईक (वय २५, रा. कवलापूर) यास धक्का दिला व शिवीगाळ केली. यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने प्रथम लाचाबुक्यांनी मारहाण करून त्यांना जमिनीवर पाडले आणि त्यानंतर जवळील दगडाने डोक्यात वार करून गंभीर जखमी केले.
जखमी अवस्थेत विश्वास सुतार यांना ग्रामस्थांनी तात्काळ सिव्हील हॉस्पिटल, सांगली येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी पथक तयार करून तातडीने तपास सुरू केला.
तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी रोहित नाईक हा कवलापूर येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात ग्रामस्थांच्या ताब्यात असल्याचे समजताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
सदर आरोपीस पुढील तपासासाठी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

No comments: